विशाळगडावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेनेचा इशारा, प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम

ऐतिहासिक विशाळगडासारख्या संरक्षितस्थळी पक्के बांधकाम करण्यास परवानगी नसतानाही येथे तीन-तीन मजली इमारती बांधल्याच कशा? यावेळी प्रशासन काय करत होते, असा सवाल करत गडाचे पावित्र्य नष्ट करणाऱया अतिक्रमण करण्यास जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱयांना तातडीने निलंबित करावे. गडावरील मूळ अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने सात दिवसांत काढावे; अन्यथा 19 डिसेंबरला शिवसैनिक विशाळगड अतिक्रमणमुक्त करतील, असा इशारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे, संजय पवार तसेच शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

स्वराज्यासाठी बलिदान देणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे या रत्नांच्या विशाळगडावर समाधी आहेत. महादेवाचे प्राचीन मंदिरही आहे. पण गेल्या काही वर्षांपासून गडावर वाढलेले अतिक्रमण तसेच चरस, गांजा, अफू या अंमली पदार्थांसह जनावरांच्या होत असलेल्या कत्तली आणि दुर्गंधीमुळे या गडाचे पावित्र्य नष्ट झाले आहे. यापूर्वी अनेकवेळा शिवप्रेमींकडून हे अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाकडे फेऱया मारल्या. कायदेशीर लढाई लढली. त्यानंतर पुरातत्व खात्याने अतिक्रमण काढण्याचे पत्र देऊनही जिल्हा प्रशासनाकडून कसलीच कारवाई झाली नाही.

सध्या गडाच्या पायथ्याखाली वन विभागाच्या जागेतील पार्ंकगची अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत. पण, मूळ अतिक्रमण आता हटवले नाही, तर ते पुढेही काढण्यास विलंबच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी सात दिवसांत गडावरील मूळ अतिक्रमण हटविले नाही, तर येत्या 19 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्यास अभिषेक करून हजारो शिवसैनिक व शिवप्रेमी गडावर जाऊन अतिक्रमण हटवतील, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

विशाळगडाचा ताबा सिद्धी जोहरकडे आहे काय?

विशाळगडाचे पावित्र्य राखण्यात कमी पडलेल्या प्रशासनाचा समाचार घेताना, गडावरचे अतिक्रमण आणि घाण पाहाता या गडाचा ताबा सिद्धी जोहरकडे आहे काय? असा खोचक सवाल शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला. बाबरीप्रमाणे शिवसैनिकच हे अतिक्रमण उद्ध्वस्त करतील आणि ही धमक फक्त शिवसैनिकांतच असल्याचेही त्यांनी सांगितले.