धामापूर जिल्हा परिषद गटावर भगवा फडकला, शिवसेना विजयी

1966
shiv-sena-devrukh-dhamapur

संगमेश्वर तालुक्यातील धामापूरतर्फे संगमेश्‍वर जिल्हा परिषद गटावर शिवसेनेने पुन्हा आपला भगवा फडकावला आहे. शिवसेनेचे शंकर भुवड यांनी राष्ट्रवादीसह भाजपचे ‘पानीपत’ करत येथून 398 मतांनी दणदणीत विजय मिळवला.

धामापूर जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी 9 हजार 558 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी केवळ 45 टक्क्यांवर राहिली. यातही 3983 पुरुषांचा तर 55575 महिला मतदारांचा समावेश होता. आज सकाळी 10 वाजता देवरूख तहसिल कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. एकावेळी 10 टेबलांवर 10 केंद्रांची मतमोजणी करण्यात आली. या गटात एकूण 31 केंद्र असल्याने चार फेर्‍या करण्यात आल्या. पहिल्या फेरीत भाजपचे अमित ताठरे यांना 916, राष्ट्रवादीचे सुशिल भायजे यांना 1033, शिवसेनेचे शंकर भुवड यांना 1279 मते मिळाली तर नोटाला 87 लोकांनी कल दिला. पहिल्या फेरीत सेनेच्या उमेदवाराला 246 मतांची आघाडी होती. दुसर्‍या फेरीत अमित ताठरे यांना 290, भायजे यांना 1192, भुवड यांना 1180 तर नोटाला 97 मते पडली. या फेरीत राष्ट्रवादीने नाममात्र 12 मतांची आघाडी घेतली. तिसरी फेरी शिवसेनेला लाभदायक ठरली. यात भाजपला 445, राष्ट्रवादीला 1389, शिवसेनेला 1696 तर नोटाला 88 मते मिळाली. या फेरीत शिवसेनेने पुन्हा 307 मतांची आघाडी मिळवली. चौथी फेरी पुन्हा राष्ट्रवादीसाठी लाभदायक ठरली. यात भाजपला 70, राष्ट्रवादीला 216, शिवसेनेला 73 तर नोटाला 7 मते मिळाली. या फेरीत राष्ट्रवादीने 143 मतांची आघाडी मिळवली.

एकूण चारही फेरीत मिळून भाजपचे अमित ताठरे यांना 1221, राष्ट्रवादीचे सुशिल भायजे यांना 3820, शिवसेनेचे शंकर भुवड यांना 4228 तर नोटाला 279 मते मिळाली. यात शिवसेनेचे उमेदवार शंकर भुवड यांनी राष्ट्रवादीचे कडवे आव्हान मोडीत काढत 398 मतांनी विजय मिळवत हा गट पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार सुहास थोरात यांनी तर सहाय्यक म्हणून नायब तहसिलदार गोसावी यांनी काम पाहिले. मतमोजणी कक्षाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिनही पक्षांचे समर्थक पोलीस परेड मैदानावर उपस्थित होते. शिवसेनेच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच उपस्थित शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.
आजच्या विजयानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली.

विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यासाठी माजी आमदार सुभाष बने, सदानंद चव्हाण, महिला जिल्हा संघटक वेदा फडके , तालुकाप्रमुख प्रमोद पवार, माजी सभापती ऐश्‍वर्या घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, संतोष थेराडे, पंचायत समिती सभापती सोनाली निकम, उपसभापती अजित गवाणकर, जनक जागुष्टे, सुभाष नलावडे, दिलीप सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. दुपारनंतर उमेदवाराची देवरूख- संगमेश्‍वर – माखजन अशी जंगी मिरवणूक काढण्यात आली. सर्वच ठिकाणी भुवड यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या धामापूर जिल्हा परिषद गटात शिवसेना उपनेते उदयजी सामंत आणि किरण सामंत यांनी विशेष लक्ष घालून विरोधकांना धोबीपछाड दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या