रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर, हिंगोली, जालन्यात भगवा फडकला

अमरावती, कोल्हापूर, सांगलीचे जिल्हा परिषद उपाध्यक्षपदही शिवसेनेकडे

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई महानगरपालिकेनंतर राज्यातील २५ जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पाच जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. कोकणातील रत्नागिरी, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह मराठवाडय़ातील संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या पाच महत्त्वाच्या जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद शिवसेनेने काबीज केले. अमरावती, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदीही शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

या निवडणुकीत दहा जिल्हा परिषद अध्यक्षपदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी पाच जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे मिळवली. प्रत्येक पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेत इतर पक्षांशी युती करीत जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले. कमी जागा मिळालेल्या असतानाही भाजपने बीड जिल्हा परिषदेवर शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली.

मराठवाडा शिवसेनेच्या ताब्यात, जालन्यात दानवेंना दणका
संभाजीनगर, हिंगोली आणि जालना या तीन महत्त्वाच्या जिल्हा परिषदांवर भगवा फडकवून शिवसेनेने मराठवाडा ताब्यात घेतला. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी पाटील-डोणगावकर, तर उपाध्यक्षपदी काँग्रसचे केशवराव तायडे विजयी झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना त्यांच्याच जालना जिल्ह्यात शिवसेनेने दणका दिला. तिथे शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांनी उपाध्यक्षपद पटकावले. हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे विजयी झाल्या.

नाशकातही शिवसेनेचा अध्यक्ष
नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्ष तर काँग्रेसच्या नयना गावित उपाध्यक्षपदी विजयी झाल्या. शिवसेनेचे पांडुरंग राऊत हे २३ मार्च १९९७ रोजी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा शिवसेनेने अध्यक्षपद मिळवले. नाशिक जिल्हा परिषदेत २६ सदस्य विजयी झाल्याने शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला.
रत्नागिरीत शिवसेना बिनविरोध
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक शिवसेनेने प्रचंड संख्याबळाच्या जोरावर बिनविरोध जिंकली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा सावंत आणि उपाध्यक्षपदी संतोष थेराडे विजयी झाले. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून स्नेहा सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्रा ठाकूर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून संतोष थेराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र आंब्रे यांनी अर्ज भरले. ठाकूर आणि आंब्रे यांनी नंतर आपले अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. स्नेहा सावंत या रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव जि. प. गटातून निवडून आल्या आहेत तर संतोष थेराडे हे कडवई जि.प.गटातून विजयी झाले आहेत. यापूर्वी दोघांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती पदावर काम केले आहे.

कोणत्या जिल्हा परिषदांवर कोणाचा झेंडा…
शिवसेना – रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर, हिंगोली, जालना
भाजप – बीड, लातूर, कोल्हापूर, सांगली, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, बुलढाणा, सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस – पुणे, सातारा, रायगड, परभणी, धाराशीव
काँग्रेस – नांदेड, नगर, अमरावती, यवतमाळ, सिंधुदुर्ग

बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का
बीडमध्ये भाजपने राष्ट्रवादीत फूट पाडत शिवसेना आणि शिवसंग्रामच्या मदतीने सत्ता काबीज केली. बीडच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार तर शिवसंग्रामच्या जयश्री मस्के उपाध्यक्षपदी विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या पाच सदस्यांनी धनंजय मुंडे यांना धक्का देत भाजपला मदत केली.

अमरावती, सांगली, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे उपाध्यक्ष
अमरावतीमध्ये अध्यक्षपदी काँग्रेसचे नितीन गोंडाने तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता ढोमने विजयी झाले. सांगली जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीने पहिल्यांदाच सत्ता मिळवली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे संग्रामसिंह देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर विजयी झाले. कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या शौमिका महाडिक तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील विजयी झाले. या निवडीवेळी प्रचंड राजकीय चुरस निर्माण झाल्याने जिल्हा परिषद आवारात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निलेश राणे यांचा चिटणीसपदाचा राजीनामा
तब्बल दीड वर्षे उलटले तरी काँग्रेसला रत्नागिरीत काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बनवता न आल्याच्या मुद्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेश चिटणीस पदाचा आज राजीनामा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या