शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी

सामना प्रतिनिधी । मुंबई 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून विभागप्रमुख विलास पोतनीस यांची उमेदवारी जाहीर केली.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. शिवसेनेचे पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळावी म्हणून मला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती डॉ. सावंत यांनी गेल्या आठवडय़ात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून केली होती. म्हणूनच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे. शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २५ जूनला होणार आहे.

 नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांना उमेदवारी

नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही उमेदवारी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजी शेंडगे आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगड जिल्हा संपर्कप्रमुख व ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुखांनी यापूर्वीच जाहीर केली आहे.