महाराष्ट्र शासनाने प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविलेले ‘शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ या वर्षीही सामाजिक संदेश देणारा ज्वलंत चलचित्र देखावा साकारणार आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गाजणारा महिलांवरील अत्याचार या विषयावर जागृती केली जाणार असून समाजाला स्त्राr सुरक्षेचा संदेश देणार आहे. दररोज अत्याचार-अन्याय होऊनही तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याने ‘ती’ अन्यायग्रस्त महिला या देखाव्यात ‘माझं काय चुकलं’ असा सवाल समाजाला विचारणार आहे.
शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली सात दशके गणेशोत्सव साजरा करीत आहे. सामाजिक देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा वसाच मंडळाने घेतलेला आहे. कोरोना काळात खंडित झालेली सामाजिक देखाव्यांची मालिका या वर्षी मंडळ पुन्हा एकदा सुरू करीत आहे. ‘शिवडीचा राजा’ हा सामाजिक देखाव्यांचा राजा म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच तमाम शिवडीकर आणि गणेश भक्तांच्या आग्रहामुळे या वर्षी मंडळाने ज्वलंत विषय घेऊन देखावा साजरा करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सन 2003मध्ये ‘मी मुंबईकर’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन मंडळांना केले होते. त्यांच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘शिवडीचा राजा’ मंडळाने 52व्या वर्षात ‘मी मुंबईकर’ हा ज्वलंत देखावा सादर केला होता. सदर देखाव्याला शिवसेना दक्षिण मध्य मुंबई आणि शिवसेना विभाग आयोजित गणेश दर्शन स्पर्धेत ‘प्रथम क्रमांकाचे’ पारितोषिक मिळाले होते. प्रत्यक्ष बाळासाहेबांच्या हस्ते ‘खासदार चषक’ देण्यात आले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने याही वर्षी आठ मिनिटांचा ज्वलंत देखावा सादर केला आहे. देशात नियमित घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनेवर आधारित ज्वलंत व वास्तवदर्शी देखावा… माझं काय चुकलं…?
‘तिला’च का विचारला जातोय प्रश्न…
एकापाठोपाठ घडणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. बलात्कार घडतो… चर्चा होतात… ज्या वेगाने प्रतिक्रिया येतात त्याच वेगाने शांतही होतात… बलात्कारितेच्या अब्रूची लक्तरे मात्र वेशीवर टांगली जातात… वर जो तो उपदेशाचे डोस तिलाच पाजत सुटतो… सातच्या आत घरात ये… कपडे नीटनेटके घाल… पदर ढळू देऊ नकोस… मान वर करून चालू नकोस… खरंतर तिला शिकवण्याची मुळी गरजच नाही, ती शिकली आहे, सबळ झाली आहे… सक्षमही झाली आहे. तिच्याच साथीनं भारताने आज मंगळावर स्वारी केली आहे. एक मुलगी म्हणून जन्माला आली यात तिचं काय चुकलं? तिच्यावर अन्याय होत असताना तिलाच का विचारला जातोय याकडे देखाव्यातून लक्ष वेधले आहे. त्यामुळे देखाव्याला मुंबईकरांनी भेट द्यावी, असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक विजय इंदुलकर, अध्यक्ष श्रीकांत जाधव, सरचिटणीस समीर बोडके, खजिनदार अविनाश देशमुख खजिनदार यांनी केले आहे.