सांगलीत विविध उपक्रमांचे आयोजन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण सांगली शहर भगवेमय झाले होते. जिह्यात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दणाणून गेले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच अनेक मंडळांनी जोरदार तयारी केली होती. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने जिजाऊवंदना, शिवजन्माचा पाळणा, आतषबाजी आणि लाडूवाटप असे कार्यक्रम करण्यात आले. यावेळी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. मावळा प्रतिष्ठान आणि रॉयल फाऊंडेशनतर्फे मैदानी खेळांची प्रात्यक्षिके, तसेच केलेल्या रोषणाईने संपूर्ण शहर उजळून निघाले होते.

मराठा सेवा संघाच्या वतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ पोलीस बॅण्ड, ढोल, लेझीम, मर्दानी खेळ असे कार्यक्रम आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवाजी मराठा मंडळाने गव्हर्न्मेंट कॉलनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. स्फूर्ती चौकात साखरवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सांगलीची अख्खी बाजारपेठ आज भगव्या रंगाने न्हाऊन निघाली होती. शिवजयंतीमुळे शहरातील सर्व वातावरण शिवमय झाले होते. भगवे ध्वज, भगवे फेटे, पताकांनी बाजारपेठ व शहरातील प्रमुख मार्ग भगवेमय झाले होते. पोवाडे, शिवघोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते.

महापालिकेत शिवजयंती उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेकडून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सादर केले. कार्यक्रमास सहायक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, मानसिंग पाटील, चिदानंद कुरणे, भगवान पांडव, चंद्रकांत आडके, सुनील पाटील, नकुल जकाते, सुनील माळी, विनायक शिंदे, प्रणील माने, धनंजय कांबळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.