
स्वामीराज प्रकाशन या संस्थेमार्फत मंगळवार, 27 सप्टेंबर रोजी शिवाजी मंदिर येथे ‘मराठी आठव दिवस’ चा जागर होणार आहे. सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होईल . कार्यक्रमाला सर्वांना मुक्त प्रवेश असून मोफत सन्मानिका उद्या सोमवारपासून शिवाजी मंदिर येथे वितरित होतील.
स्वामीराज प्रकाशनच्या वतीने दर महिन्याच्या 27 तारखेला ‘मराठी आठव दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येतो. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन हा या उपक्रमाचा हेतू आहे. आतापर्यंत कोल्हापूर, कणकवली, गोवा, मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी येथे विविध कार्यक्रम सादर झाले आहेत. या महिन्याचा कार्यक्रम शिवाजी मंदिर येथे होणार आहे.
यावेळी ‘नाटककारांच्या शोधात’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून त्यात प्रशांत दामले, राहुल भंडारे, ज्ञानेश महाराव, संतोष पवार, राजेश देशपांडे आणि सुप्रिया विनोद हे मराठी रंगभूमीवरील आघाडीचे कलावंत – निर्माते यात सहभागी होणार आहेत. नवीन मराठी नाटय़ संहिता का सापडत नाहीत? जुनी नाटकं नव्या संचात का बघावी लागतात? या प्रश्नांचा मागोवा या परिसंवादात घेतला जाणार आहे. सूत्र संचालन नाटय़ समीक्षक राज चिंचणकर करतील.
त्यानंतर पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांची ‘गंध स्वरांचा’ ही मराठी गाण्यांची मैफल सादर होणार असून सुप्रसिद्ध गायक अतुल बेले त्यांना साथ देणार आहेत. ‘मराठी आठव दिवस’ चा हा जागर यशस्वी होण्यासाठी मराठी रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्था संचालिका रजनी राणे यांनी केले आहे.