ठसा – शिवाजीराव पाटील निलंगेकर

3082

>> अभय मिरजकर

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हणजे संघर्षशील नेतृत्वाचे प्रतीकच. जन्मापासून त्यांचा सुरू असलेला संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच होता. निलंग्याचेच नव्हे तर सबंध लातूर जिह्याचे ‘दादासाहेब’ म्हणजे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हीच त्यांची ओळख होती.

9 फेब्रुवारी 1931 रोजी निलंगा येथील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर आर्यसमाज चळवळीचा मोठा प्रभाव होता. निजाम राजवटीच्या अन्यायाचा त्यांनी अनुभव घेतलेला होता. त्यामुळे गुलबर्गा येथे विद्यार्थीदशतेच त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतल़ा त्यामुळे त्यांना अटकही झालेली होती. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढय़ातही त्यांचा सहभाग होता. वडिलोपार्जित शेती व्यवसाय असल्याने त्यांना शेतीची विशेष आवड होती. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्याविषयी त्यांना विशेष जिव्हाळा होता. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली होती. नागपूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली होती. गावाची ओढ आणि घरातील जबाबदारी या कारणामुळे त्यांनी निलंगा हीच आपली कर्मभूमी निवडली होती. प्रारंभी त्यांनी वकिली व्यवसायही केला होता. 1958 ते 1962 या कालावधीत त्यांनी निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. 1962 मध्ये सर्वप्रथम ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. त्या वेळी निलंगा विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव होता. तब्बल 9 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. एक वेळेस ते विधान परिषदेवर निवडून गेले होत़े त्या वेळी त्यांचे पुत्र दिलीप पाटील हे विधानसभेवर निवडून आले होते. 1974 मध्ये सर्वप्रथम ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झाले. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी विविध खात्यांचें मंत्री म्हणून काम पाहिलेले होते. 9 महिन्यांचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी राज्याचा कारभार पाहिलेला होता. त्यांच्यावर आरोप होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

लातूर जिह्याची निर्मिती, संभाजीनगर येथे खंडपीठाची निर्मिती, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी असली पाहिजे यासाठी घेतलेला निर्णय, लोकन्यायालयाची सुरुवात, मागास वस्त्यांचे संपूर्ण विद्युतीकरण, विदर्भातील रस्त्यांचे रुंदीकरण, घाटातील रस्त्यांचे रुंदीकरण, मराठवाडय़ातील रस्त्यांचे जाळे व सुधारणा, अनेक न्यायालयीन इमारतींचे बांधकाम, प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना, जलसिंचनासाठी लोअर तेरणा प्रकल्प, उजनी प्रकल्प, कुकडी प्रकल्प, सिंदफणा प्रकल्प, कृष्णा प्रकल्प, मांजरा प्रकल्प अशा अनेक मोठय़ा, मध्यम व लघु योजना आखून त्या अमलात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सहकारी चळवळीतही त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. किल्लारी सहकारी साखर कारखानानिर्मिती, अंबुलगा सहकारी साखर कारखानानिर्मिती, लातूरची जवाहर सहकारी सूतगिरणीचे संस्थापक असे त्यांचे योगदान राहिलेले आहे. चळवळीत काम करणाऱयांशी त्यांचा थेट संपर्क होता.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. संभाजीनगरात खंडपीठ असावे, अशी मागणी त्यांनी इंदिराजींकडे केल़ी त्यास मंजुरीही मिळाली. काँग्रेसने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्याक्ष पदाची जबाबदारीही सोपवलेली होती. महाराष्ट्र, मराठवाडा, लातूर जिल्हा आणि निलंगा तालुक्यातील विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी शिक्षण संस्था निर्माण केली. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. निलंगा येथे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्राचे डी.फार्म. व एम फार्म शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. अगदी शून्यातून विश्वाची निर्मिती असा शिवाजीरावांचा प्रेरणादायी संघर्षशील प्रवास पुढील पिढीसाठी कायम मार्गदर्शक ठरणारा राहील.

आपली प्रतिक्रिया द्या