‘शिवकार्य’चे भरपावसात दुंधा किल्ल्यावर श्रमदान

25

सामना प्रतिनिधी, नाशिक

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने सुवर्णमहोत्सवी श्रमदान मोहीम मालेगाव तालुक्यातील दुंधा किल्ल्यावर भरपावसात राबवित तळ्यांची स्वच्छता केली. यावेळी उपस्थित दुर्गसंवर्धकांनी ‘मी राबणार दुर्गांच्या अस्तित्वासाठी’ असा संकल्प केला.

सह्याद्रीच्या पश्चिमेकडील हा किल्ला देवस्थान व परिसरासाठी टेहळणीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता. या किल्ल्यावर प्राचीन षटकोनी बारव, कातीव कड्यांवरील दगडी पायऱ्या, पडझड झालेली तटबंदी, कोरीव जलाशये, पुरातन दुंधेश्वर महादेवाचे मंदिर आणि पाण्याचे कोरीव टाके बघावयास मिळतात. ही ५०वी मोहीम राबविण्यापूर्वी त्यांनी सटाणा तालुक्यातील देवळाणे येथे प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराची पाहणी केली, त्यानंतर किल्ल्यावर चढाई केली, तेथे पूर्णपणे बुजलेले, काटेरी साबरात हरवलेले दोन दगडी टाके दिसले, त्यातील काटेरी साबर बाजूला करुन माती, दगड बाहेर काढले. किल्ल्यावरील देवटाके, स्नानाचे टाके, शेवाळटाके, पिंपळटाके यांची पाहणी करीत मोजमापे घेत त्यांचे पेन्सील स्केच केले.

पन्नासाव्या मोहिमेनिमित्त संस्थापक राम खुर्दळ यांनी संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास उलगडला. स्वखर्चातून निस्वार्थीपणे केलेल्या संवर्धन कार्याची माहिती दिली. याप्रसंगी बजरंग पवार, युवराज पवार, गोरख मोहिते, निमंत्रक सोमनाथ मुठाळ, डॉ. अजय कापडणीस, डॉ. संदीप भानोसे, यशवंत धांडे, राजेंद्र कटय़ारे, कृष्णचंद्र विसपुते, राहुल भोसले, गणेश सोनवणे, प्रमोद चव्हाण, मनोज अहिरे, गजानन दिपके, रतनकुमार भावसार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या