ठाणे किल्ल्याची विजयगाथा

69

>> संदीप शशिकांत विचारे

श्री शिवप्रताप प्रतिष्ठान’ ही ठाण्यातील संस्था १५ मार्च २०१८ रोजी रात्री ८.३० वा. गडकरी रंगायतन येथे ‘ठाणे विजय दिन’ साजरा करत आहे. इतिहासप्रेमी नागरिकांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणीच आहे.

चिमाजी आप्पा यांनी अतुलनीय शौर्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाण्याचा किल्ला काबीज केला. भारतीय राज्यकर्त्यांनी पाश्चात्य साम्राज्याकर मिळविलेल्या या इतिहासातल्या पहिल्या विजयाची गाथा.

साडेतीनशे वर्षांची गुलामगिरीची रात्र संपून महाराष्ट्रावर ६ जून १६७४ ला हिंदवी स्वराज्याची पहाट झाली. श्रीशिव छत्रपती झाले. पण ठाण्यात आणि गोव्यात फिरंग्यांचा म्हणजेच पोर्तुगीजांचा जुलमी अंमल सुरूच होता. अखेर अंजूरचे गंगाजी नाईक यांनी १७२१-२२ साली बाजीराव पेशव्यांकडे फिरंग्यांविरुद्ध तक्रार केली, ‘वसई आणि साष्टी प्रांत फिरंग्यांकडे आहे. त्याने देवस्थाने, तीर्थे व महाराष्ट्र धर्माचा लोप केला आहे. हिंदू लोक भ्रष्ट करून त्यांना ‘क्षार’ केले आहे. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना व स्वधर्म स्थापना करावी.’

१७३४ साली गंगाजी नाईक व वासुदेव जोशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन, छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौज साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले. लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली.

२६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले. अपुरा दारुगोळा आणि शिबंदी यामुळे पोर्तुगीज आपल्या कुटुंबकबिल्यासह गलबतातून वसई आणि उरणकडे पळून गेले. २९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले. हिंदुस्थानी उपखंडात प्रस्थापित झालेली परकीय सत्ता समूळ नष्ट झाल्याची घटना इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. चिमाजी आप्पांच्या ठाणे किल्ला विजयाने वसई मोहिमेच्या विजयाची नांदी झाली. पुढे चिमाजी आप्पांनी वसईवर जरीफटका फडकवून या मोहिमेची इतिश्री केली. पेशव्यांनी अणजूरकर नाईकांना पत्र लिहून त्यांची सरबराई केली.

पोर्तुगीजांनंतर मराठेशाहीचा अस्त झाला. इंग्रजांचे परचक्र आले. त्यांनी ठाण्याच्या किल्ल्याचे जेलमध्ये रूपांतर केले. या जेलमध्ये स्वा. वि. दा. सावरकर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, दत्ताजी ताम्हाणे यांना इंग्रजांनी बंदिवान केले होते. जुलमी इंग्रज कलेक्टर जॅक्सनचा वध करणाऱ्या क्रांतिकारक हु. अनंत कान्हेरे, हु. कृष्णाजी कर्वे, हु. विनायक देशपांडे यांना फाशी देण्यात आली. असा आहे आमचा ठाणे किल्ला. आज जरी तो ठाण्याचा तुरुंग म्हणून ओळखला जात असला तरी तो आपल्या स्वातंत्र्याचे, आद्यक्रांतिकारकांचे स्मारक आहे. तो मुक्त झाला पाहिजे. ठाण्यात जुलमी राजवटीने भग्न केलेल्या इतिहासाचे अवशेष विखुरलेले आहेत. ते एकत्र करून त्याचे एक भव्य संग्रहालय ठाण्यात उभारण्यासाठी कोकण इतिहास परिषद झटत आहे. सरकारने या कामात त्यांना सहकार्य करावयास हवे. ठाण्याच्या पूर्व भागात मिठबंदर येथे नऊ ते दहा तोफा बेवारस अवस्थेत पडल्या आहेत त्यांचे योग्य जतन व्हायला हवे.

चिमाजी आप्पा यांनी आपल्या अतुलनीय शौर्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाण्याचा किल्ला काबीज केला. भारतीय राज्यर्कत्यांनी पाश्चात्य साम्राज्याकर मिळविलेला हा इतिहासातला पहिलाच विजय. मराठी दौलतीसाठी परकीय सत्तेविरुद्ध लढत, त्यांना धडा शिकवून त्यांच्या प्रबळ धार्मिक व राजकीय महत्त्वकांक्षांना मर्यादा घातल्या.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या