‘टायगर’ कोण? शिवराजसिंह की ज्योतिरादित्य? मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा

मध्य प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार झाल्यानंतर राज्याच्या राजकारणातील ‘टायगर’ कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कॉँग्रेस सोडून भाजपसोबत गेलेल्या ज्योतिरादित्य यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ अशा शब्दांत टीकाकारांना उत्तर दिले आहे. हाच डायलॉग 2018 मध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी मारला होता. त्यामुळे सरकारमधील वर्चस्वाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

कमलनाथ यांच्या नेतृत्वातील कॉँग्रेसचे सरकार पाडून मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार स्थापन होण्यात ज्योतिरादित्य यांची फार महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातदेखील त्यांना मोठा वाटा देत त्यांच्यासोबत आलेल्या 22 आमदारांपैकी 11 जणांची मंत्रीपदावर वर्णी लावण्यात आली आहे. मंत्रिमंडळात जवळपास 41 टक्के हिस्सेदारी ही ज्योतिरादित्य यांची असल्याने आगामी काळात मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याचे दिसत आहे. कॉँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी बिचाऱया शिवराजसिंह यांच्याकडून मंत्रीपद हिसकावून घेतले, आता तर ‘टायगर’ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली आहे.

मामा-महाराज संघर्ष
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशमध्ये ‘मामा’ म्हणून परिचित आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता गेल्यावर काय होणार याची चिंता करू नका, ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणा केली होती. पुढे हाच डायलॉग ते मध्य प्रदेशच्या राजकारणात सातत्याने मारत होते. मंत्रिमंडळात मोठा वाटा देण्यास विरोध करणाऱया शिवराजसिंह यांच्या सरकारमध्ये जास्तीत जास्त मंत्रीपदे पदरात पाडून घेणाऱया महाराज ज्योतिरादित्य यांनीही नेमका तोच डायलॉग मारत आगामी राजकीय संघर्षाबाबत सूचक इशाराच दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या