हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर राज्याभिषेक सोहळा

सामना ऑनलाईन, महाड

भगव्या पताका.. तलवारींचा खणखणाट.. भव्य कमानी.. ढोलताशांचा गजर.. पोवाडे.. आणि ‘जय भवानी…जय शिवाजी’च्या आसमंत दणाणून सोडणाऱया घोषणा.. अशा भारलेल्या वातावरणामुळे किल्ले रायगडावर शिवकालच अवतरला होता. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे ३४४ वा राज्याभिषेक सोहळा आज विधिवत आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात पार पडला. हजारो शिवभक्तांनी हा सोहळा याचि देही याचि डोळा पाहिला.

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवमूर्तीला महाराष्ट्रातील सप्तनद्यांच्या जलाने जलाभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. या सोहळ्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री विजय शिवतारे सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले, आमदार रूपेश म्हात्रे, अमित घोडा, समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडाचे अध्यक्ष सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शस्त्र्ापूजन आणि गौरव 

हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरीने लढय़ात प्राणाची बाजी लावणारे कान्होजी जेधे, कृष्णाजी बांदल, येसाजी कंक, तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी गडपूजनबरोबरच मानाच्या हत्यारांचे शस्त्रपूजनही करण्यात आले. शिवराज्याभिषेक पूजेचा मान महाडमधील कोकण कडाचा कार्यकर्ता रोहित पवार या दांपत्याला मिळाला.

रायगडला पुन्हा गतवैभव मिळेल

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड अखंड हिंदुस्थानचा मानबिंदू आहे. त्यामुळे रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घेतला असून रायगडला पुन्हा गतवैभव मिळेल असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या