कन्नडिगांची दडपशाही; बेळगावात घुसून भगवा फडरविणाऱया शिवसैनिकांवर गुन्हा, बेळगावात येण्यासही घातली बंदी

कानडी पोलिसांना चुकवून बेळगावातील कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकावल्याप्रकरणी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह आठ शिवसैनिकांवर बेळगावच्या काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांना बेळगावात प्रवेश करण्यासही स्थानिक प्रशासनाने बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. कानडी प्रशासनाच्या या दडपशाहीला काडीचीही किंमत देण्यात आली नाही.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी कर्नाटक राज्याचा लाल-पिवळा ध्वज बेकायदेशीररीत्या उभारला आहे. बेळगाव महापालिकेवर भगवा ध्वज फडकाविण्याचा ठराव असतानाही हा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज जाणीवपूर्वक फडकाविण्यात आल्याने मराठी भाषिकांनी तो हटविण्यासाठी बेळगाव प्रशासनाला निवेदने दिली.

मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेने गुरुवारी (दि. 21) भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी कोल्हापुरातून शिवसैनिक निघाले असता, सर्वांना कानडी पोलिसांनी कोगनोळी टोलनाक्यावर रोखले होते. यावेळी भगवा ध्वज फडकावण्यासाठी कर्नाटक सीमेवर लागून असलेल्या महाराष्ट्रातील शिनोळी (ता. चंदगड) येथे कोल्हापूर जिह्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करून सीमाभागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर मोठय़ा संख्येने असलेल्या कानडी पोलिसांना चकवा देत दुपारी गनिमी काव्याने बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी या गावात जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर आदी शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकावला होता.

तुरुंगात टाकले तरी लढा सुरूच राहणार -विजय देवणे

कर्नाटकात घुसडण्यात आलेले 865 मराठी भाषिक गावे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तुरुंगवास भोगून या लढय़ाला बळ दिले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेने आणि शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगव्याचा शिपाई आणि शिवसैनिक म्हणून अशा गुह्यांना घाबरणार नाही. कितीही गुन्हे दाखल करा; मराठी भाषिकांसाठी तुरुंगात जायलाही तयार आहोत. मात्र, हा लढा सुरूच राहणार आहे, असे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी ठणकावले.

आपली प्रतिक्रिया द्या