संतापाचा उद्रेक, मुख्यमंत्री-गडकरींच्या सभेत शिवसैनिकांचे निषेध आंदोलन

सामना ऑनलाईन । अकोला

महाराष्ट्रामध्ये बोंडअळीने धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न बोंडअळीने गिळंकृत केले आहे. शेतकरी हवालदिल झालेला असताना सरकार उद्घाटने करून फक्त जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गडकरींच्या अकोला येथील सभेत जबरदस्त असे निषेध आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी सोयाबीन फेकत आणि बोंडअळी दाखवून निषेध केला.

अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम होता. बोंडअळी, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांचे नुकसान झाले असताही सरकारकडून काहीच पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सभा उधळण्यासाठी आंदोलन केले.

गांधीग्राम येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसैनिक मुकेश निचळ, रोशन पर्वतकर, बजरंग गोतमारे, कार्तिक गावंडे, संतोष जगताप, शंकर यादव, नितीन गोलम यांनी सभेदरम्यान घोषणा दिल्या तसेच सोयाबीन फेकत आणि बोंडअळी दाखवत निषेध केला. शेतकरी हिताकरता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यांना जागे करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली. अटकेनंतर काही वेळाने त्यांची सुटकाही करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या