केडगाव दगडफेक प्रकरण- शिवसैनिक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

93

सामना प्रतिनिधी, नगर

नगर केडगाव येथे झालेल्या दुहेरी हत्या प्रकरणानंतर शिवसैनिकांवर तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील ११ जण आज स्वतःहून कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. या ११ जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या ११ जणांमध्ये माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विशाल वालकर, सचिन शिंदे, आशा निंबाळकर, सागर थोरात, प्रशांत गायकवाड, अभिषेक भोसले, आदिनाथ जाधव, उमेश काळे, तेजस गुंदेचा यांचा समावेश आहे. हे सर्वजण मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्याची माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली आहे.

केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर तसेच वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला होता. तसेच या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी चक्काजाम केला होता. या प्रकरणाबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी घटनेच्या दोन दिवसानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी ५०० ते ६०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांसाठी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या