शिवसैनिकाने नाल्यात उडी घेऊन वाचवले चिमुरडीचे प्राण’ वाकोल्यातील घटना, धाडसाचे सर्वत्र कौतुक

674

मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता वाकोला नाल्याजवळचे एक दुमजली घर थेट नाल्यात कोसळले. यात आई आणि तिच्या तीन मुली वाहून जाऊ लागल्या. ही बाब लक्षात येताच नाल्याच्या बाजूला राहात असलेल्या एका शिवसैनिकाने जिवाची पर्वा न करता नाल्यात उडी मारली आणि त्यातील तीन वर्षांच्या मुलीला वाचवले. शिवसैनिकाच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईत सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. सोमवारी रात्रीपासूनच पाऊस कोसळू लागला. वाकोला नाल्याजवळील आज सकाळी साडेअकरा वाजता आग्रीपाडा परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चाळीतील एक दुमजली घर कोसळले. यात रेखा काकडे (29) आणि श्रेया (6), शिवोन्या (3) आणि जान्हवी (दीड वर्ष) वाहून जाऊ लागले. ही बाब स्थानिक राकेश शेगडे या शिवसैनिकाच्या लक्षात येताच त्याने जिवाची पर्वा न करता नाल्यात उडी घेत शिवोन्या हिला वाचवले. मात्र, अन्य तिघे नाल्यात वाहून गेले. शिवोन्या हिला सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, रेखा आणि जान्हवी यांचे मृतदेह हाती लागले असून श्रेया या मुलीचा शोध अजून सुरू आहे. रेखा यांचे पती मिलिंद हे मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी आहेत. ते कामाला गेले असल्यामुळे बचावले. कलिनाचे आमदार, विभागप्रमुख संजय पोतनीस आणि नगरसेवक दिनेश कुबल यांना ही घटना समजताच त्यांनी देसाई रुग्णालयात जाऊन मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान, अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये कामाला असलेल्या राकेश शेगडे यांच्या या धाडसाचे कौतुक म्हणून संजय पोतनीस, दिनकर कुबल यांनी शिवसेनेच्या वतीने शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्याला शाबासकी दिली. वाकोला नाल्यावर संरक्षण भिंत बांधावी, यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या