जालन्यात शिवसेना आक्रमक; ईडीची प्रतिमा जाळत संजय राऊत यांच्या अटकेचा निषेध

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत जालना जिल्ह्यातील परतूर तालुका शिवसेना आक्रमक झाली असून सोमवारी येथील महादेव चौकात शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला.

यावेळी ठिय्या आंदोलन करत शिवसेनेच्या वतीने ईडी हाय…हाय…अशी घोषणाबाजी करण्यात आली. ईडीची प्रतिमा जाळत आपला निषेध व्यक्त केला. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेली कारवाई ही आकासापोटी असून भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांच्याविरोधात देशात कट कारस्थान सुरू असून या सर्व घटनाक्रमाचा आम्ही निषेध करतो, अशा घोषणा करत शिवसैनिकांनी सर्व परिसर दणाणून टाकला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र शासन राबवत असलेल्या हुकुमशाहीचा अंत जवळ आला असून जनता पेटून उठत या सरकारला सत्तेतून पायउतार केला शिवाय शांत बसणार नाही असा इशारा दिला. संजय राऊत यांच्यावर कारवाई म्हणजे रडीचा डाव असून एकीकडे राज्याचे राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्राबद्दल बेताल व्यक्तव्य करत मराठी अस्मितेचे खच्चीकरण व द्वेष करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी कालची राऊत यांच्यावर कारवाई केली असल्याचे ते म्हणाले.

देशात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर होणारी कारवाई हा सत्तेचा दुरुपयोग असून या सरकारला जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी ईडीच्या प्रतिमेला जाळत शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाले यांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलकांना शांत केले.

येथील चौकात दुपारी एकच्या दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, शहरप्रमुख दत्ता सुरुंग यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत दोलन करत काही वेळ वाहतूक ठप्प केली.