उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील पाण्यासाठी शिवसेना आक्रमक!

सामना ऑनलाईन, मुंबई 

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील पिण्याच्या पाण्यात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत अंबरनाथ आणि बदलापूरला ३० एमएलडी तर उल्हासनगरला ५० एमएलडी पाणी वाढवून द्यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरांत पाणी वाढवून देण्याची मागणी शिवसेनेकडून मागील अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला, मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शिवसेना आमदारांनी आज जोरदार आंदोलन केले.

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, रवी पाठक, सुभाष भोईर यांनी विधानसभेबाहेर घोषणा देत या शहरांना पाणी वाढविण्याची मागणी केली. बारवी धरणाचे पाणी वाढवून त्याची क्षमता वाढविण्यात आली, मात्र त्यानंतरही एमआयडीसी अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरला पाणी वाढविण्यात आलेले नसल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले. या आंदोलनाची दखल घेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत आमदारांसोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या