जळगाव जिल्ह्यासह राज्यात शिवसेना -भाजपची युती अभेद्य

44

सामना ऑनलाईन | जळगाव

राज्यात शिवसेना व भाजपची युती अभेद्य राहील तसेच जळगाव जिल्ह्यात सर्व आमदार युतीचेच निवडून येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपडा तालुक्यातील वाळकी गावात विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वाळकी -मालखेडा शेंदणी या सहा किलोमीटर अंतर रस्त्याचे भूमिपूजन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गुरुवारी वाळकी गावात करण्यात आले. या वेळी मंचावर राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार चंद्रकांत सोनवणे, उपसभापती एम. व्ही. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, राजेंद्र पाटील, आबा देशमुख, हरीश पाटील, भरत बाविस्कर, किशोर चौधरी, रोहिणी पाटील, मंगला पाटील, संध्या महाजन, अॅड. एस. डी. सोनवणे, मोतीलाल पाटील, नामदेव पाटील, दीपक जोहरी, माणिकचंद महाजन, ए. के. गंभीर, मधुकर पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केले.

यावेळी बोलतांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेला मराठा समाजाची ३८ टक्के मते मिळतात. युतीत जेवढे आमदार मराठा समाजाचे आहेत तेवढे तर राष्ट्रवादी व काँग्रेसचे होऊ शकले नाहीत. आम्हाला जातीपातीवर नको तर विकासावर व गुणपत्रिका पाहून मते द्या. हिंदुह्रयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला भगवा कधी सोडणार नाही म्हणूनच मोठय़ा मताधिक्याने लोकसभेला उन्मेष पाटील यांना विजयी करू शकलो. जातीपातीचे राजकारण या राज्यात नाही, म्हणूनच ब्राह्मण समाजाचा माणूस मुख्यमंत्री आहे.

यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, चार वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अंतर्गत राज्यात सर्वदूर मोठी कामे सुरू आहेत. अतिक्रमण जागा, गावठाण जागेवर 2011 नंतर ज्यांनी घरे बांधली असतील, ती त्यांच्या नावावर करून देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. तर आगामी महिनाभरात राज्य सरकार शेतकऱयांसाठी मोठा निणऱय घेणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या