नगरमध्ये शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

सामना प्रतिनिधी । नगर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या लावलेल्या रोपाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आजही शिवसैनिकांमध्ये धगधगत्या निखार्‍यासारखे आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तोच वसा घेऊन वाटचाल करत आहेत. आता विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक कटीबध्द असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राठोड म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी दिलेले विचार आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. शिवसेनेने अनेक वादळे पाहली आहेत. शिवसैनिक म्हणजे धगधगता कोळशाचा निखारा आहे. शिवसेना सोडणाऱ्यांचे काय झाले, हे प्रत्येकाला माहित आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे दूरदृष्टी आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न व शेतकर्‍यांचे प्रश्नांसाठी शिवसेनाप्रमुखांचा विचार आणि कार्य ते जोमाने पुढे नेत आहे. त्यांच्या आदेशाने शिवसैनिक वाटचाल करत आहेत. नगर शहरातही गेल्या 30 वर्षात शिवसेनेने सामाजिक कार्य करुन पक्ष भक्कम केला आहे. किती आले किती गेले त्यांचे काय झाले आहे हे सांगण्याची गरज नाही, जतनेचा विश्वास शिवसेनेवर असल्यानेच त्यांनी नगर शहरामध्ये 28 नगरसेवक निवडून दिले आहेत. शिवसेना कायमच अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमीच आवाज उठवते, असे ते म्हणाले.

संपूर्ण संरक्षण घेऊन नगर शहरात शिवसेना जनतेच्या पाठीशी सातत्याने उभी राहते याची आठवण करुन देत राठोड यांनी शहरात भगव्या छत्र्यांचे वाटप केले. पेढे वाटून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. तसेच आज शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नामफलकाचे अनावरण, शाखा उद्घाटन, फळ वाटप, वह्या पुस्तकाचे वाटप आदीसंह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अर्जुन बोरुडे, संजय शेंडगे, गणेश कवडे, दत्ता जाधव, योगीराज गाडे, अनिल शिंदे, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, गिरीष जाधव, संजय गेणाप्पा, सुभाष पडोळे, शाम नळकांडे, विशाल वालेकर, काका शेळके, संजय आव्हाड, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, उषा ओझा, सुरेखा भोसले, श्रीदेवी अरगोंडा, अरुणा गोयल आदी उपस्थित होते.