कर्जमुक्ती मिळेपर्यंत लढा सुरूच राहील : शिवसेना

30

सामना ऑनलाईन । बुलढाणा

शिवसेनेच्या वतीने पश्चिम विदर्भात (वऱ्हाडात) आज शिवसंपर्क अभियान राबवण्यात आले. बुलढाणा, अकोला, अमरावती जिह्यातील गावे शिवसेनेच्या आमदार, नगरसेवकांनी पिंजून काढत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा हा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही शिवसेनेच्या पथकांनी शेतकऱ्यांना दिली.

संकटांचा सामना करताना पिचून गेलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. मराठवा़ड्यात शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीपणे राबवल्यानंतर पश्चिम विदर्भातील तीन जिह्यांत शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा रविवारी पार पडला. या अभियानात आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगरसेवक आसाराम चाचे, प्रदीप निकम, राजेश सावरकर यांनी देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर गडचिरोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव व नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी खामगाव तालुक्यातील गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार उदय सामंत व नगरसेवक वसंत नकाशे यांनी जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी आणि शिवसेना पदाधिकाऱयांच्या भेटी घेतल्या.

आपली प्रतिक्रिया द्या