
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काहीदिवसांपूर्वी खेड विराट सभा पार पडली होती. या सभेत उद्धव ठाकरे गद्दार मिंधे गटाचा चांगलाच समाचार घेतला होता. ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली, त्याच मैदानात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार आहे. दरम्यान मिंधे गटाचे रामदास कदम यांनी या सभे निमित्त ‘विरोधकांच्या मनात नुसती आग कारण मैदानात उतरला आहे, ढाण्या वाघ,’ ‘करार जबाब मिलेगा’, अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. याला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर करत कदम यांच्यावर घणाघात केला आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव म्हणाले की, “करारा जबाब देण्यासाठी दम असायला लागतो. ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम. रामदास कदम हे एका मतदारसंघापुरते मर्यादीत आहेत. हे काय करारा जबाब देणार. त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरी तो डोंगर किंवा बैल होऊ शकत नाही. रामदास कदम नावाचे बेडूक किंवा शिंदे गट कोकणात बोलून फुगेल. निवडणुकीच्यावेळी लोकं हळूच टाचणी लावून हा फुगा फोडलीत,” अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी सभा म्हणजे पोरकटपणा
5 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सभा आयोजित करण्यात आली आहे. ‘निष्ठावंतांचा एल्गार’ असे या सभेचे वर्णन कदम पिता-पुत्रांनी केले आहे. यावर आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “लोकशाहीमध्ये कोणीही, कुठेही सभा घेऊ शकतो. पण म्हणून प्रत्येक सभेला उत्तर दिले जात नाही. पण रामदास कदम एका पिसाने मोर होतात. उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी सभा घेणे हा पोरकटपणा आहे.”
एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संयमाने वागावे, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे ही उत्तर सभा म्हणजे त्यांच्यासाठी राजकीय ‘उत्तरकार्य’ ठरेल. आता हे उत्तर देणार म्हणजे नेमके काय करणार? कशाचे उत्तर देणार? गद्दारी का केली, याचे उत्तर देणार का? किती खोके घेतले याचे उत्तर देणार का ? की पक्ष सोडताना तुम्ही किती खोटे बोललात याचे उत्तर देणार? असा सवाल यावेळी जाधव यांनी उपस्थित केला.