लोकांचं ठरलंय! महाराष्ट्रात महायुतीचंच मजबूत सरकार!!

1169
Harshavardhan patil join bjp

लोकसभा निवडणुकीचा निकाल मतदारांनी ठरवला होता. आताही कोणाला निवडून द्यायचे ते ठरवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप मित्रपक्षांची महायुती पुन्हा एकदा भक्कमपणे आणि पूर्वीपेक्षा अधिक जागा घेऊन निवडून येईल, असा जबरदस्त आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. आतापर्यंत निवडणुकांमध्ये ‘ऍण्टीइन्कबन्सी’ बघायला मिळत होती, पण लोकसभा निवडणुकीमध्ये ‘प्रो इन्कबन्सी’ बघायला मिळाली. आताही सरकारच्या बाजूने मतदारांची सकारात्मकता आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार राज पुरोहित, अतुल शहा, हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता, मुलगा राज्यवर्धन तसेच पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार काम करीत आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही हेच सरकार पुन्हा निवडून द्यायचा संकल्प जनतेने केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप महायुती पुन्हा एकदा भक्कमपणे  निवडून येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हर्षवर्धन पाटील जर लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी भाजपमध्ये आले असते तर बारामतीबाबतचा संकल्प पूर्ण झाला असता. हर्षवर्धन पाटील खासदार झाले असते. सुप्रियाताईंना घरी पाठवले असते, मात्र ते हुशार राजकारणी आहेत. लोकसभेच्या निकालानंतर बघू असे त्यांनी ठरविले होते. आता पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. आमची आधीची घोषणा होती ‘अब की बार 220 पार.’ पण आता ती घोषणाही मागे पडली असून त्यापेक्षाही जास्त विक्रमी जागा निवडून येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

शेजार बदलू शकत नाही

हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघाला लागूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा बारामती मतदारसंघ आहे. त्याचा उल्लेख करीत हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले की, आमच्या मतदारसंघांचा भूगोल तुम्हाला माहिती आहे, मित्र व शत्रू बदलू शकतो, पण शेजार बदलू शकत नाही असे सांगत पवार यांच्यापासून संरक्षण करण्याची अप्रत्यक्षपणे विनंती हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मी कोणतीही अट न घालता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडायची माझी तयारी आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या