चर्चा फक्त दानवेंच्या विजयाची आणि काँग्रेसच्या ‘अदृश्य हातांची’

4974

विधानपरिषदेच्या संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार उमेदवार अंबादास दानवे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विक्रमी मताधिक्याने भलेभले चकीत झाले आहेत. दानवे यांना कोणी कोणी मतदान केले असावे याचा मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या मंडळींनी आणि त्यांच्या विरोधकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली.

या निवडणुकीमध्ये एकूण 647 मते पडली होती. यातील शिवसेना भाजपची हक्काची अशी 292 मते होती. 35 ते 45 नगरसेवकांनी दानवे यांना आधीच समर्थन दिले होते. या सगळ्यांच्या एकूण मतांपेक्षा दानवे यांना 187 अधिकची मते मिळाली आहे. विजयानंतर अंबादास दानवे यांनी त्यांना मत देणाऱ्या सगळ्या मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांच्या विक्रमी विजयाबाबत दानवेंना विचारलं असता ते म्हणाले की “काँग्रेसची काही लोकं म्हणत होती की अदृश्य हात त्यांना मदत करतील, आता अदृश्य कोण झालं हे चित्र या निकालातून स्पष्ट झाले”

दानवे यांनी त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या भवानीदास कुलकर्णी यांचा तब्बल 418 मतांनी पराभव केला. दानवे यांना हक्काच्या मतांशिवाय अधिकची 187 मते मिळाल्याने त्यांच्या मतांच्या संख्येत वाढ झाली. हे अदृश्य 187 हात कोण याचा गुप्त मददान असल्यामुळे अंदाज बांधणं कठीण झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या