नेरळ ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी महायुती सज्ज

1156

नेरळ ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज  दाखल  करण्याची मुदत 16 ऑगस्ट रोजी संपत असून सर्व पक्षांनी आपली हालचाल जोरात सुरू केली आहे. या ग्रामपंचायतीसाठी शिवसेना, भाजप व आरपीआय युती आहे. काँग्रेस व इतर पक्षांच्या आघाड्यांचे घोंगडे अजून भिजत आहे. पण या निवडणुकीत शिवसेना आपले वर्चस्व सिद्ध करील, असा विश्वास शिवसेनेचे  रायगड संपर्क प्रमुख दत्ता दळवी यांनी व्यक्त केला.

नेरळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत  शिवसेना भाजपा युती एकत्र लढणार आहे. त्यादृष्टीने  स्थानिक नेत्यांची बोलणी सुरु आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी नेरळमधील शिवसैनिकांची  महत्वपूर्ण बैठक  झाली. संपर्क प्रमुख दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, माजी उप जिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, शहरप्रमुख रोहिदास मोरे यांच्यासह अनेक स्थानिक नेते या बैठकीस उपस्थित होते.

नेरळ ग्रामपंचायतीच्या १७ जागा आहेत . या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि आरपीआय युती होणार असून सरपंचपद आणि नऊ जागांवर शिवसेना लढणार आहे. सात जागा भाजप आणि एक जागेवर आरपीआय लढणार असल्याची माहिती देण्यात आली.

नेरळ ग्रामपंचायत ही खूप मोठी असल्याने ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आता सर्वच पक्षांनी ताकद लावायला सुरूवात केली आहे. पण या ग्रामपंचायतीवर  शिवसेना, भाजपा आणि आरपीआयचे वर्चस्व राहील, असा विश्वास शहरप्रमुख रोहिदास मोरे यांनी व्यक्त केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या