आडवली मालडीत शिवसेनेचाच घरोघर प्रचार  

सामना ऑनलाईन । मालवण

जिल्हा परिषद पंचायत समितीतील काँग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभाराने जनता त्रस्त बनली आहे. २१ फेब्रुवारीला होणारी निवडणूक हि काँग्रेस विरोधात परिवर्तनाची नांदी ठरणारी आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख शिरवंडे पंचायत समितीचे उमेदवार बाबा सावंत यांनी व्यक्त केला.

आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघात असगणी  येथे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता. १५) प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी बाबा सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हा परिषद उमेदवार बंडू चव्हाण, पंचायत समिती उमेदवार संतोष घाडी, यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ व युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. शिरवंडे पंचायत समिती मतदार संघात केवळ बेनामी ठेकेदारीचीच कामे करण्यात आली . रस्ते, विहिरी बंधारे, स्ट्रीट लाईट, नळपाणी योजना, या ग्रामस्थांच्या प्राथमिक गरजाही अपेक्षितरित्या पूर्ण झाल्या नाहीत. केवळ स्वार्थासाठी विकास झाल्याने जनतेला अपेक्षित असणारा विकास साध्य झाला नाही. जिल्हा परिषद मतदार संघातील १७ गावात समान न्याय देण्याचे काम जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडून झाले नाही. त्यामुळे या भागातील जनता वैभव नाईक यांच्या नेतृत्वार विश्वास ठेऊन शिवसेनेसोबतच राहील. असा विश्वास बंडू चव्हाण व बाबा सावंत यांनी व्यक्त केला.

मतदार संघात गेली २० ते २५ वर्षे काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेली घराणेशाही मोडीत काढली जाणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याच मालकीची असल्याप्रमाणे वावरणाऱ्या लोकप्रतिनिधीना जनता त्यांची  जागा दाखवून देईल. असे सांगत सावंत यांनी हा जिल्हा परिषद मतदार संघ आपली कर्मभूमी असून जनतेला अपेक्षित असलेला विकास जनतेला सोबत घेऊनच साध्य केला जाईल . आगामी काळात बेनामी ठेकेदारी हद्दपार केली जाईल. शिवसेनेच्या माध्यमातून कॉयर बोर्ड असो अथवा विविध योजना यांच्या माध्यमातून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली जाईल. शेतकरी, महिला, तरुण यांना  रोजगार निर्मिती करताना त्यांना सक्षम बनविले जाईल. पपई लागवड असो शेतीच्या विविध योजना असो मोठा विकास मतदार संघात केला जाणार आहे. फणस , आंबा, काजू, कोकम आवळा, या फळांवर प्रक्रिया करणारे युनिट मतदार संघात उभारण्याचा मानस  बाबा सावंत यांनी व्यक्त केला.

निकृष्ट कामांच्या चौकशीची मागणी करणार ;

आडवली  मालडी  जिल्हा परिषद व शिरवंडे पंचायत समिती  मतदार संघात गेल्या काही वर्षात  अनेक कामे करण्यात आली  आहेत. मात्र, अनेकठिकाणी खचलेले बंधारे, उखडलेले रस्ते, हि दर्जाहीन कामाची वस्तुस्थिती दर्शवत आहे. बाणेवाडी ते बामणेवाडी या मार्गावरील बंधारा पूर्णपणे खचला आहे. तर त्याठिकाणी झालेला जोडरस्ताही ज्या पद्धतीने उभारण्यात आला याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असून मतदार संघातील सर्वच कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करणार असल्याचे बाबा सावंत यांनी स्पष्ट केले.