‘वेळीच महाराष्ट्रद्रोह्यांना रोखलं नाही तर…’; उद्धव ठाकरे कडाडले, ‘मविआ’ची मुंबईत विशेष बैठक

17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र द्रोहींविरुद्ध हल्लाबोल करण्यासाठी विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वेळीच या महाराष्ट्रद्रोह्यांना आवरलं नाही, तर महाराष्ट्र छिन्नविच्छिन्न करायला हे मागेपुढे पाहणार नाहीत’, असा घणाघात केला. या मोर्चात विविध राजकीय विचारधारेच्या महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं, या आवाहनाचा पुनरुच्चार देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या बैठकीचा हेतू मा. अजितदादांनी सांगितलेलाच आहे. परवाची बैठक ही थोडीशी धावपळीत झाली त्यावेळी आम्ही मोजकेच उपस्थित होतो. आज महाविकास आघाडीचे सर्व घटक मित्रपक्ष एकत्रित आहेत. 17 तारखेला महाराष्ट्र द्रोहींविरुद्ध हल्लाबोल असा महाप्रचंड, अतिविराट मोर्चा, ज्याची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हा मोर्चा जाईल. मला खात्री आहे की हा मोर्चा न भूतो न भविष्यति असा होणार आहे, याचं कारण असं की सातत्याने महाराष्ट्राचा जो अपमान, अवहेलना केली जात आहे. महाराष्ट्राचं अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय. त्याही विषयी मोर्चात बोलणार आहोत, असं ते यावेळी म्हणाले.

निवडणुकांसाठी भाजपने सुरू केलेल्या राजकारणाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याच्या कडेकडेच्या गावांवर आजूबाजूची राज्यं हक्क सांगू लागली आहेत. अगदी मुंबई सुद्धा, तिच्यावर कसा घाला घातला जातोय, त्याही बद्दल एक विषय होणार आहे. नंतर मी परवा बोललो होतो की, महाराष्ट्रातून जे उद्योग पळवले गेले, मी मघाशी माझी प्रतिक्रिया ज्या निवडणुकांचे निकाल लागले, त्या निकालांच्या निमित्ताने दिली आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, गेल्या वेळी ज्या तीन निवडणुका झाल्या होत्या, एक दिल्ली महापालिका, दुसरी हिमाचल आणि गुजरात या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिंकला होता. यावेळी मात्र दिल्लीत आप जिंकली आहे, हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकली आहे आणि गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. या यशाबद्दल यशाच्या मानकऱ्यांचं अभिनंदन आम्ही करतोच आहोत. पण, गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचंही योगदान आहे, हे विसरता कामा नये. एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडायचा, आपलं इप्सित साध्य करायचं. म्हणूनच आम्हाला जी भीती वाटते की गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले उद्योग जसे पळवले तसंच कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील गावं तोडतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच वेळीच या महाराष्ट्रद्रोह्यांना आवरलं नाही, तर महाराष्ट्र छिन्नविच्छिन्न करायला हे मागेपुढे पाहणार नाहीत, असा घणाघात त्यांना यावेळी केला.

या मोर्चासाठी आवाहन करताना ते म्हणाले की, यांच्या मनात जे काही विष आहे किंवा होतं म्हणा, ते आता उघडपणाने जगजाहीर होत आहे. आपल्या माध्यमातून मी परत एकदा जे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे किंवा राजकीय विचारांचे असोत, पण महाराष्ट्रप्रेम हा एक समान धागा घेऊन आता सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन आम्ही करत आहोत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.