शिवसेनेचा गिरगाव दहीकाला महोत्सव या वर्षी रद्द

683

महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कोकणात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभाग क्र.12च्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘गिरगाव दहीकाला महोत्सव’ या वर्षी रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने गिरगाव नाव्यावर दरवर्षी दहीकाला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गिरगावची ही मानाची दहीहंडी मुंबईत नामांकित  समजली जाते. 250 ते 300 गोविंदा पथके या दहीकाला महोत्सवात सहभागी होतात. मात्र या वर्षी राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कोकणात पूर येऊन लाखो कुटुंबांची अपरिमित हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत काही लोकांचे बळी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे या वर्षी दहीकाला महोत्सव रद्द करून पुरस्काराची रक्कम पूरग्रस्तांना देण्याचे विभागातील शिवसैनिकांनी ठरवले आहे. लवकरच ही रक्कम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी कळवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या