मोठा नेता हा फक्त पदाने नाही तर कर्तृत्वाने होत असतो! सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला

राजा हा नेहमी दिलदार असला पाहिजे, मोठा नेता हा फक्त पदाने नाही तर कर्तृत्वाने होत असतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. दसरा मेळाव्यावरून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांनीही या राजकारणाबद्दलची नाराजी बोलून दाखवली आहे.

सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘काही दिवसांपूर्वी पवार साहेब म्हणाले होते की मुख्यमंत्री पद हे खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेश असलं पाहिजे. आमच्याही काळात दसरा मेळावे व्हायचे, अनेक पक्षांचे मेळावे व्हायचे. दिलदारपणे आमच्याविरोधात त्या व्यासपीठावरून भाषणं व्हायची. आम्हीही तेव्हा उत्सुकतेने बातमी काढायचो की आपल्या विरोधात काय बोललेत…मोठा नेता हा फक्त पदाने नाही तर कर्तृत्वाने होत असतो. राजा हा नेहमी दिलदार असला पाहिजे. त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी ही गोष्ट आहे.’