पार्किंगसाठी शिंदे गटाचा विद्यापीठातील जागेवर डोळा, विद्यार्थी संघटनांचा विरोध

एकनाथ शिंदे गट दसऱ्याच्या दिवशी वांद्रे कुर्ला संकुल इथे सभा घेणार असून यासाठी येणाऱ्यांना त्यांच्या गाड्या पार्क करता याव्यात यासाठी मुंबई विद्यापीठातील मोकळ्या जागांवर त्यांनी डोळा ठेवला असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले यांनी आरोप केला आहे की, विद्यापीठातील 3 ते 4 मोठ्या आणि मोकळ्या जागांवर शिंदे गटाच्या सभेसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्किंगसाठी या मोकळ्या जागांवरील गवत कापले जात असून जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने जागेचं सपाटीकरण करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मातेले यांनी याप्रकाराबाबत बोलताना म्हटले की, “विद्यापीठाचं संकुल हे विद्यार्थ्यांसाठी आहे. इथलं गवत वाढल्यानंतर ते कापलं जातं. जेसीबी आणून इथे जे काम सुरू आहे त्यामुळे संकुलातील जमिनीची हानी झाली आहे. कुलुगुरूंच्या निवासस्थानासमोरील जागा, राष्ट्रीय विज्ञान केंद्र (नॅनो सायन्स) इथे जेसीबीने हे काम सुरू आहे. रातोरात झाडं कापली गेली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगसाठी व्यवस्था इथे केली जात आहे. विद्यापीठात 100 हून अधिक जेसीबी, डंपर आले आहेत. महापालिकेचे अधिकारीही इथे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस इथे एकाही गाडीला येऊ देणार नाही.

सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी या प्रकाराबाबत बोलताना म्हटले की, “प्रभारी रजिस्ट्रार हे एकेकाळी विनोद तावडे यांचे सीएस होते. ते असे निर्णय घेऊ शकतात. यापूर्वी राजकीय पक्षाच्या सभेसाठी विद्यापीठाचे मैदान देण्यात आले नव्हते. आम्हीही याविरोधात आवाज उठवणार आहोत. राज्यपालांकडेही याबाबत तक्रार करणार आहे”