गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 350 स्पेशल ट्रेन चालवा! कोकण रेल्वेकडे शिवसेनेची मागणी

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले, मात्र बुकिंग सुरू होताच अवघ्या एका मिनिटांत कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस आणि इतर गाडय़ांची प्रतीक्षा यादी हजार ते बाराशेच्यावर पोहोचली. त्यामुळे रात्रभर जागून तिकिटाच्या रांगेत उभ्या राहिलेल्या प्रवाशांच्या पदरी निराशा पडली. रेल्वे प्रशासन व तिकीट एजंट यांची मिलिभगत तसेच तिकीट विक्रीचा काळाबाजार यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव-खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेऊन चाकरमान्यांना होणारा त्रास निदर्शनास आणून दिला. त्याचबरोबर जास्तीत जास्त हॉलिडे स्पेशल ट्रेन गणेशोत्सवादरम्यान चालवण्यात याव्यात अशी आग्रहाची मागणी केली.

नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत कोकणातील रेल्वेमधील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासंदर्भात या बैठकीत जोर देण्यात आला. रेल कामगार सेनेच्या माध्यमातून कोकण रेल्वेमध्ये होणाऱया खासगीकरणाच्या विरोधात ओपन मार्केटमधून प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात सरचिटणीस दिवाकर देव यांनी आग्रही मागणी यावेळी केली. यावर कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती त्वरित कारवाई करण्याचे तसेच जास्तीत जास्त हॉलिडे स्पेशल चालवण्यासंदर्भात मान्यता देण्याचे मान्य केले. तिकीट विक्रीच्या होणाऱया गैरकारभारावर कडक कारवाई करण्याचे आदेशदेखील त्यांनी संबंधितांना दिले.

कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, कोकण रेल्वे सरचिटणीस राजू सुरती, मोहन खेडेकर, मिनाझ झारी, नागराज देवाडिगा, राहुल पवार, नरेश पाटील, भांडुप विधानसभा संघटक नंदकुमार पाटकर, स्थानीय लोकाधिकार समितीचे रामचंद्र आंग्रे, कळव्याचे उपविभागप्रमुख वैभव शिरोडकर, दर्शन कासले, ठाण्यातील कोकण प्रवासी संघटनेचे राजू कांबळे, महाराष्ट्र वाहतूक सेना उपाध्यक्ष गिरीश विचारे आदी यावेळी उपस्थित होते.