कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासासाठी केंद्राने 500 कोटी द्यावेत; शिवसेनेची लोकसभेत मागणी

23

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सुमारे 162 वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासाची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी शिवसेनेने शुक्रवारी लोकसभेत लावून धरली. मुंबई विद्यापीठाच्या विविध समस्या सोडवण्यासाठीही केंद्राने पुढाकार घ्यावा अशी मागणीही करण्यात आली. सेंट्रल युनिव्हर्सिटीज बिल 2019 अंतर्गत ही मागणी करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. राज्य सरकार किंवा विद्यापीठाकडे मोठय़ा प्रमाणावर निधीच उपलब्ध नसल्याने कलिना कॅम्पसचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने 500 कोटींचा निधी या पुनर्विकासासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेवाळे यांनी केली.

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 86 पदांपैकी 59 पदे रिक्त आहेत, तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 129 पदांपैकी 57 पदे रिक्त आहेत. विद्यापीठाला उत्पन्न नसल्याने आणि प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागत असल्याने ही रिक्त पदे भरली जात नसल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारला मुंबईतून 40 टक्के महसूल

केंद्र सरकारला मुंबईतून तब्बल 40 टक्के महसूल जात असून केवळ हे लक्षात घेता केंद्र सरकारने मुंबई विद्यापीठाचा कायापालट करण्यासाठी निधी द्यायला हवा अशी मागणी शेवाळे यांनी मांडली होती. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आणि पेपर तपासणीत बऱ्याचदा घोळ झाला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विविध समस्यांना वाचा फोडल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या