खातेधारकांना सन्मानाची वागणूक द्या, करवीर शिवसेनेचा बँक अधिकाऱ्यांना इशारा

477

कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधील गडमुडशिंगी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेतकरी कष्टकऱ्यांना देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक त्वरित थांबवा, शेतकऱ्यांशी मराठीत संभाषण करा, तसेच सर्वसामान्य खातेधारकांना सन्मानाची वागणूक द्या, अन्यथा बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा करवीर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी देण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन बँकेचे व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया यांना देण्यात आले. शिवसेनेने केलेल्या केलेल्या मागणीची तातडीने पूर्तता करु, तसेच बँकेकडून यापुढे कोणतीही तक्रार येणार नाही, असे आश्वासन चौरसिया यांनी दिले.

करवीर पूर्व भागातील गडमुडशिंगी, उंचगाव, सरनोबतवाडी, गांधीनगर, वसगडे, सांगवडे, वळीवडे, चिंचवाड, सांगवडेवाडी, हालसवडे आदी गावांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राची गडमुडशिंगी येथे शाखा आहे. येथे व्यवस्थापकांसह रोखपाल व कर्मचारीवर्ग कमी असल्याने, बॅंकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांची नवीन व जुनी कर्जे प्रकरणे अनेक दिवसापासून मंजूर व नुतनीकरण करुन दिली नाहीत. जबाबदार अधिकाऱ्यांविना अनेक कामे प्रलंबित आहेत. शासनाच्या सर्व जिल्हा पातळीवरच्या योजनांची माहिती दिली जात नाही. उडावाउडवीची उत्तरे दिली जातात. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक महिला,जेष्ठ नागरिक यांना मिळणाऱ्या शासकीय व निमशासकीय योजना त्वरित मंजूर करून दिल्या जात नाहीत.

बँकेत होणारी गैरसोय आणि मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि तक्रारी शिवसैनिकांपर्यंत आल्या होत्या. त्यांनी याची दखल घेत याबाबत बँकेला इशारा देण्यात आला आहे. तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे,करवीर तालुका प्रमुख राजू यादव, संदिप दळवी, गडमुंडशिगीचे सरपंच जितेंद्र यशवंत, सदस्य कृष्णात रेवडे, संभाजी पाटील, युवासेनेचे मंजित माने आदि शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या