भांडुप पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कांजूरमार्ग पूर्व येथील वाहतुकीचा फटका नागरिकांना आणि कांजूर तसेच भांडुपवासीयांना बसत आहे. या ठिकाणी भांडुप पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल तयार झाला तर वाहतुकीची समस्या सुटेल. त्यासाठी भांडुप पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून पुलाचे काम लवकरात लवकरच सुरू करावे, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने पालिका अधिकाऱयांकडे करण्यात आली.

उड्डाणपूल नसल्यामुळे कांजूर पूर्व आणि भांडुप पूर्व येथून भांडुप पश्चिम येथे जाण्यासाठी फार मोठे अंतर कापून जे.व्ही.एल.आर. किंवा नाहुर रेल्वे उड्डाणपुलावरून जावे लागते. त्यात वाहतुकीची समस्याही वाढत चालली आहे. याची गंभीर दखल घेत आमदार सुनील राऊत यांनी उपायुक्त, परिमंडळ ६, सहाय्यक आयुक्त एस विभाग, विकास नियोजन, पर्जन्य जलवाहिन्या, नियोजन कक्ष, पूल, रस्ते, वाहतूक या विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक एस विभागात घेतली. यावेळी माजी नगरसेवक बाबा कदम, नगरसेविका आणि विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे, शिवसेना पदाधिकारी अनंत पाताडे, हितेश पटेल, शिवसैनिक आदि उपस्थित होते.

नाल्याचे रुंदीकरण करून स्लॅब टाका
कांजूर मनसुख कंपाऊंडजवळील रोडलगत असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून रोडचे रुंदीकरण करावे आणि लोढा कॉम्प्लेक्स ते कर्वेनगर येथे जे.व्ही.एल.आरला जोडणाऱया डी.पी. रोडचे काम सुरू करावे, अशी मागणीही सुनील राऊत यांनी केली होती. त्याअनुषंगाने महापालिका उपायुक्तांनी बैठक घेऊन संबंधित स्थळाच्या पाहणीप्रसंगी डी.पी.रोडची जागा तत्काळ हस्तांतरित करून डी.पी.रोडचे काम सुरू करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

आपली प्रतिक्रिया द्या