ठाण्यात ग्रँड सेंट्रल पार्क, जिम्नस्टिक सेंटर, वर्किग वूमेन्स हॉस्टेल

46

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे शहराच्या लौकिकात भर टाकणा-या इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वूमेन्स हॉस्टेल आणि ग्रँड सेंट्रल पार्क या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्कचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. यावेळी महा. ओओओ या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेने ठाण्याचा स्मार्ट विकास साधणारा वचननामा ठाणेकरांना दिला होता. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ही विकासकामे मार्गी लावत शिवसेनेने वचनपुर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

विविध विकासकामांचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी ४.३० वाजता सिद्धाचल येथील वर्किंग वूमेन्स हॉस्टेलच्या भूमीपूजनाने होणार आहे. नवीन विकासकामांच्या भुमिपुजनासोबतच कम्युनिटी पार्क आणि महा.ओओओ या संकेतस्थळाचे उद्घाटनही होणार आहे. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रविंद्र फाटक, संजय केळकर, डॉ. जितेंद्र आव्हाड, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिद पाटील, नगरसेवक सोमनाथ सुरकर, देवराम भोईर, संजय भोईर, नगरसेविका जयश्री डेव्हीड, रागिणी बैरीशेट्टी, परिषा सरनाईक, उषा भोईर,निशा पाटील, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अत्याधुनिक महिला वसतीगृह

नोकरदार महिलांना राहण्याची सुविधा मिळावी यासाठी ६ कोटी ७५ लक्ष रूपये खर्च करून अत्याधुनिक वसतीगृह बांधण्यात येणार आहे. या हॉस्टेलमध्ये १५५ महिलांना राहण्याची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर वाचन खोली, टीव्ही बघण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कॅफेटेरिया सीसीटीव्ही आदी सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहेत.

इनडोअर जिम्नॅशिएम सेंटर

अंदाजे २७ कोटी रूपये खर्च खरून बांधकाम विकास हस्तातंरणाच्या माध्यमातून हे आर्टिस्टिक जिम्नॅशियम सेंटर बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, योगा कक्ष आणि ३०० प्रेक्षक क्षमता असेलली गॅलरी आदी सुविधा असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रँड सेंट्रल पार्क

ठाणे शहराच्या लौकिकात भर टाकणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रँड सेंट्रल पार्क कोलशेत रोड येथे बांधण्यात येणार आहे. बांधकाम विकास हस्तातंरणाच्या माध्यमातून २०.५ एकर जागेमध्ये हे सेंट्रल पार्क बांधण्यात येणार असून या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याची जागा, थीम उद्यान, तलाव क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, आयकॉनिक पूल आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या