मान खाली जाईल असं कोणतंही काम शिवसेनेनं केलं नाही, करणार नाही!

56
फोटो-सचिन वैद्य

सामना ऑनलाईन,मुंबई

शरमेनं वा लाजेनं मान खाली जाईल असं कोणतंही काम शिवसेनेनं केलं नाही आणि करणारही नाहीअसे खणखणीत प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. शिवसेना भवनात शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड यश मिळवत मुंबईत पहिले स्थान मिळवले. या सर्व नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाच्या सूचना केल्या. निवडणूक प्रचारकाळात शिवसेनेवर
आरोपांची राळ उडवून देण्याचा प्रयत्न झाला होता. याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आरोप खूप झाले हे खरं पण शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. एकही आरोप कोणी सिद्ध करू शकलं नाही. मान खाली घालावी लागेल असं शिवसेनेनं काही केलं नाही. आरोप करणाऱयांना करू द्या. त्याने काही फरक पडत नाही.

वचननाम्याचा पाठपुरावा करा!

राज्याचे आणि देशाचे लक्ष लागून राहिलेले असते अशा महापालिकेच्या सभागृहात तुम्ही बसणार आहात. या सभागृहाची वेळ पाळा. तुम्ही नगरसेवक  असलात तरी शिवसैनिक आहात. शिवसेनेने दिलेल्या वचनांसाठी झटा. त्या वचनांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सर्व शिवसेना नेते व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकपदाची जबाबदारी आणि महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात तांत्रिक बाबींविषयी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी मार्गदर्शन केले.

त्यामतदारांसाठी न्यायालयात दाद मागा!

तब्बल बारा लाख मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली. त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. हा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मतदारांची नावं गायब झाली हे गंभीर आहे. ज्यांची नावं गायब झाली अशा सर्वांचा शोध घ्या. सर्व शाखांतून या मतदारांचा शोध सुरू करा. त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्या सर्वांच्या तक्रारींची नोंद घ्या. या सर्व तक्रारींचा गठ्ठा घेऊन न्यायालयात दाद मागू!

एकजूट कायम ठेवा!

‘कोणी फितवण्याचा प्रयत्न करेल, कोणी विष कालवण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही एकजूट तोडू नका’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. समोर सत्ता, संपत्ती आणि साधनांचा गैरवापर सुरू असताना आपण लढलो ते केवळ शिवसैनिकांच्या जीवावर.  शिवसैनिक एकवटला तर तो कोणतंही आव्हान पेलू शकतो. हेच आपलं भांडवल आहे. या शिवसैनिकांमुळेच महानगरपालिकेतील हा विजय मिळाला आहे. त्यांनी रात्रंदिवस अपार मेहनत घेतली, कष्ट केले त्याचे हे फळ आहे. त्या शिवसैनिकांना विसरू नका’ अशी पुस्तीही उद्धव ठाकरे यांनी पुढे जोडली.

आपली प्रतिक्रिया द्या