शिवसेनाच नंबर वन : १८७ ग्रामपंचायतींपैकी शिवसेना ६४, शेकाप ४५, राष्ट्रवादी ३७

110

सामना प्रतिनिधी । अलिबाग

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला असून रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ६४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत शिवसेनेने भगवा फडकवला आहे. महाड, खालापूर, पोलादपूर, श्रीवर्धन, रोहा इत्यादी तालुक्यांमध्ये विजयाची पताका फडकवत शिवसेनाच नंबर वन ठरली आहे. त्याखालोखाल शेकाप ४५, राष्ट्रवादी काँग्रेस ३७, काँग्रेस ८, भाजप ९ तर विविध पक्षांच्या आघाडी व अपक्ष अशा ९ जागांवर सरपंच निवडून आले आहेत.

जिल्ह्यातील १८७ पैकी १५९ सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका २७ मे रोजी पार पडल्या. २६ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध जाहीर झाल्या होत्या, तर २ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रिक्त राहिलेल्या आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सरपंचपदाची निवडणूक ही थेट नागरिकांमधून होणार असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयांबाहेर निकाल ऐकण्यासाठी शिवसैनिकांसह सर्वच पक्षांतील कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार विजयी घोषित होताच शिवसैनिकांनी तहसील कार्यालयांबाहेर एकच जल्लोष केला.

पेण-तरणखोपमधील शेकापची मक्तेदारी शिवसेनेने मोडून काढली
पेण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या तरणखोप ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकावून शिवसेनेने शेकापची मक्तेदारी मोडीत काढली आहे, तर दुसरीकडे बोरी ग्रामपंचायतीत सर्व पक्षांनी एकत्र ताकद लावूनही शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी बोरी ग्रामपंचायतीवर भगवा फडकावून विरोधकांना चारीमुंड्य़ा चीत केले आहे. सरपंचपदासह एकूण शिवसेनेचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, शहरप्रमुख ओंकार दानवे, जगदीश ठाकूर, माजी उपजिल्हाप्रमुख शैलेश पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस वासुदेव पाटील यांनी केला.

खालापूर, श्रीवर्धन, पोलादपूर, महाडमध्ये भगवा जल्लोष
खालापुरातील २२ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले, तर श्रीवर्धन येथील सहापैकी सर्वाधिक चार जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. वावे तर्फे श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचे शिलेदार विजयी झाले आहेत.

पोलादपूर तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या वेळेस कापडे, पळचील, बोरज-साखर आणि देवपूर या ग्रामपंचायती शिवसेनेने काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेतल्या असून भाजपच्या हातातून कोंढवे ग्रामपंचायत खेचून आणण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. महाड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहेत. शिवसेनेने बावले, नेराव, टोळ बुद्रुक या तीन ग्रामपंचायती शिवसेनेने कॉँग्रेसच्या ताब्यातून घेतल्या. माणगाव तालुक्यातही आठ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे. शिवसेनेने या वेळेस फळसगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेचून आणली. शिवसेनेने रोह्यात जोरदार मुसंडी मारली असून कोकबन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला, तर अलिबागमध्ये शिवसेनेने कामार्ले ग्रामपंचायत शेकापकडून खेचून आणली आहे.

मुरुड, पनवेलमध्ये शेकापचे वर्चस्व
मुरुड आणि पनवेल तालुक्यांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली आहे. मुरुडमध्ये १४ पैकी पाच ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाचे थेट सरपंच व सदस्य निवडून आले आहेत, तर पनवेलमध्ये भाजपला छोबीपछाड देत शेकापने १४ पैकी ९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.

अलिबाग, कर्जत, मुरुड, तळा भाजपकडे
अलिबाग, कर्जत, मुरुड, तळा येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीत पीछेहाट होताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या