दोन मंत्र्यांचे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच! आदित्य ठाकरे यांचा जबरदस्त घणाघात

ज्यांना शिवसैनिकांनी डोक्यावर घेऊन मोठे केले ते शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. आता ते म्हणतात, आम्ही गद्दारी नव्हे तर बंड केले, पण बंड करायला हिंमत लागते. ते परराज्यात पळून जात नाहीत, याला शूरपणाही म्हणता येत नाही. गद्दार आमदारांनो, तुम्ही आता आहात तिथेच आनंदात रहा. याच गद्दारांनी महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना दोन मंत्र्यांचे सरकार स्थापन केले. आता ते स्वतःला वाचवत फिरत आहेत, पण हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आजपासून राज्यव्यापी शिवसंवाद यात्रा सुरू झाली. भिवंडी येथून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे शिवसैनिक तसेच युवासैनिकांनी जोरदार स्वागत केले. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला.., हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. काही आमदार, खासदार फुटीर झाले तरी शिवसैनिकांमध्ये तोच जोश आणि तीच ताकद दिसून आली. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या रणरागिणीदेखील मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

भिवंडीतील शिवाजी चौक येथे झालेल्या जाहीर सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दगाफटका करणाऱयांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राजकारणाला गौण समजत आम्ही समाजकारणावर लक्ष केंद्रित केले. मात्र त्याचाच गैरफायदा नेमका गद्दारांनी घेतला. या गद्दारांनी शिवसेनेचाच नव्हे तर मतदारांचाही विश्वासघात केला असून हिंमत असेल तर आमदारकी व खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी फुटीरांना दिले. उद्धवजी आजारी असताना त्यांच्या वेदना मुलगा म्हणून मी जवळून पाहिल्या आहेत. त्याही परिस्थितीत ते काम करत होते. तुमच्यावरही विश्वासाने जबाबदाऱया दिल्या. परंतु मुख्यमंत्री भेटत नाहीत, असे आरोप करीत तुम्ही पाठीत गद्दारीचा सुरा खुपसलात. गेल्या महिनाभर त्यांनी सुरू केलेला तमाशा तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला तेव्हा नाही… नाही… शेम.. शेम अशा घोषणा घुमल्या.

यावेळी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, कृष्णकांत कोंडलेकर, मनोज गगे, तालुकाप्रमुख विश्वास थळे, महानगरप्रमुख श्याम पाटील, मदन भोई, स्थायी समितीचे माजी सभापती संजय म्हात्रे, इरफान भुरे, महिला संपर्क संघटक कला शिंदे, रुपल पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी भिवंडी लोकसभा जिल्हा शिवसेनेच्या वतीने नूतनीकरण केलेल्या अद्ययावत मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आज प्रथमच ठाणे नगरीत आगमन झाले. आनंद दिघे प्रवेशद्वाराजवळ असंख्य शिवसैनिक भगवे झेंडे हातात घेऊन त्यांची वाट पाहात होते. आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसैनिकांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. आदित्य ठाकरे यांनी गाडीबाहेर येत शिवसैनिकांच्या स्वागताचा मोठय़ा प्रेमाने स्वीकार केला. त्यांचा ताफा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ येताच तेथेही आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. तेथे शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांसह युवासेनेचे कार्यकर्ते तसेच ठाणे व पालघर जिल्हा संघटक अनिता बिर्जे, माजी नगरसेवक संजय तरे, केदार दिघे, महिला जिल्हा संघटक समिधा मोहिते, रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, संपदा पांचाळ, अॅड. आकांक्षा राणे, महिला शहर संघटक स्मिता इंदुलकर, वासंती राऊत, प्रमिला भांगे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, पुंदा दळवी, शीतल मिंढे, संपदा उरणकर, नंदा कोथले, राजश्री सुर्वे, युवासेनेचे नितीन लांडगे आदी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिव संवाद यात्रा आज मनमाड, येवल्यात

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा उद्या शुक्रवारी, 22 जुलै रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जाणार आहे. मनमाड येथे सकाळी पावणेबारा वाजता मेळावा होईल. त्यात नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. भावना जाणून घेतील. समस्यांची माहिती घेतील. दुपारी दीड वाजता येवला येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.