जनआशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल! शिवसेना नेते संजय राऊत यांचा विश्वास

69
sanjay-raut-saheb-new

सामना ऑनलाईन, जळगाव

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचणे व पक्ष संघटनेचा विस्तार करणे, हाच उद्देश असून जनआशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संयज राऊत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आश्वासक नेतृत्व असल्याचेही राऊत म्हणाले.

जनआशीर्वाद यात्रेचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज बुधवारी जळगावात दाखल झाले. जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की,   पीक विमा कंपन्या या खासगी आहेत. पीक विमा कंपन्या सत्तेच्या भागीदार नाहीत. विरोधी पक्ष कुचकामी व वैफल्यग्रस्त झाला आहे. खरेतर शेतकऱ्यांच्या व जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून विरोधी पक्षांनी ते सोडवायला हवेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.  शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

राममंदिराच्या मुद्दय़ाला जागे करण्याचे काम शिवसनेने केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन वेळा अयोध्येत जाऊन आले. लखनौपासून अयोध्येपर्यंत राममंदिराचा प्रश्न कोण सोडविणार, असा प्रश्न केल्यावर तेथील नागरिक ‘शिवसेना’ असे उत्तर देतात, असेही राऊत म्हणाले. राममंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असून सरकार, न्यायालय या विषयात निर्णय घेईल आणि दोन वर्षांत हा प्रश्न मार्गी लागलेला असेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात खासदार राऊत यांनी सांगितले.

ठाकरे कुटुंबाने नेतृत्व करावे ही लोकभावना 

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 10 वर्षांपासून युवकांसह नागरिकांमध्ये मिसळून  काम करीत आहेत. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे आश्वासक नेतृत्व आहे. ठाकरे कुटुंबीयांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, ही लोकभावना असून शिवसेना पक्ष व महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या