
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जागावाटपाच्या बैठका कोणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, जागावाटपाचे सूत्र काय असावे यासंदर्भात चर्चा झाली. मात्र जागावाटपासंदर्भात अजून कोणतीही चर्चा झाली नसल्याची स्पष्टोक्ती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम असून आम्ही एकत्रच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 19 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही या जागा आमच्याकडेच असतील, असे ते म्हणाले.
झोपलेल्या लोकांसमोर फडणवीसांचे वाचन
पुण्यात भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील शिवसेनेसंदर्भातील काही भाग वाचून दाखवला. फडणवीस वाचत होते त्यावेळी बैठकीतील अर्धे लोक झोपलेले होते, कोणी जांभया देत होते, कोणी पेंगत होते, कोणी आळस देत होते. झोपलेल्या लोकांसमोर फडणवीसांचे वाचन चालू होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
मेलेल्या पोपटाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न
राज्यातील घटनाबाह्य सरकारचा पोपट केव्हाच मेला आहे. मेलेल्या पोपटाला ऑक्सिजन देण्याचा बेकायदेशीर प्रयत्न सध्या सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्याविषयी निश्चितच आदर आहे. सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष फार मोठे घटनातज्ञ असल्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या निर्णयाची अपेक्षा असल्याचेही संजय राऊत म्हणाले. फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर निवडणुका घ्या म्हणजे कोणाचा पोपट उडतो हे कळेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.