मिंधे गट हा भाजपने पाळलेला कोंबड्याचा खुराडा, कधीही कापल्या जातील! संजय राऊतांनी घेतला खरपूस समाचार

मिंधे गट हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. कोंबड्या सकाळ संध्याकाळ आरवत असतात, त्यांना पक्ष म्हणतात का? तो पक्ष नाहीच आहे. कधीही त्या कोंबड्या कापल्या जातील, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. संजय राऊत म्हणाले की, हा विषय लोकशाही आणि संविधानाचा आहे. हा विषय नैतिकतेचा आहे आणि उठसूट कोणतीही याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यायचा हे या बाबतीत तरी मान्य करावं अशी गोष्ट नाही. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे. जे भाजपच्या वतीने भूमिका मांडताहेत, त्यांनी आमची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. हा विरोधासाठी विरोध नाही. हे मुद्दा या देशाचे राष्ट्रपती आणि संविधानाच्या सन्मानाचा आहे. पंतप्रधान नवीन संसद भवनाचं उद्घाटन आपल्या अधिकारांतर्गत करतील. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांना आमंत्रित केलं आहे. पण, जर तुम्ही आमंत्रण पत्रिका पाहाल तर त्यात संविधानानुसार जे दुसऱ्या क्रमांकाचे नेते असतात, त्या उपराष्ट्रपतींचं नावही त्यात नाही. राष्ट्रपतीचं नाव तर नाहीच. त्यांना आमंत्रण तर द्या. हीच बाब आहे. याविषयी कुणीही बोलत नाहीये. राष्ट्रपतींना निमंत्रण का नाही, उपराष्ट्रपतींचं नाव त्यात का नाही? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही बोलवण्यात आलेलं नाही. मग हा एका पक्षाचा समारंभ आहे का? नेमकं काय आहे? त्याचं उत्तर द्या. विरोधकांचा जो विरोध आहे. तो देशाच्या सन्मानासाठी आहे. नवीन संसदेचं उद्घाटन हा काही खासगी सोहळा नाही, हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आता तुम्ही म्हणताय की इंदिरा गांधींनी अमुक तमुक एक्स्टेन्शनचं उद्घाटन केलं होतं. पण, त्या एक्स्टेन्शन आणि संसद भवनात फरक आहे. राजीव गांधी यांनी वाचनालयाचं उद्घाटन केलं होतं, पण वाचनालय आणि संसदेत फरक आहे. वाचनालयात सत्र होत नाही, सत्र हे संसदेत भरतं. तुम्ही समोर येऊन बोला तर खरं पंतप्रधान. ऑस्ट्रेलियात लोकशाही आहे की पापुआ न्यू गिनीमध्ये आपले चरणस्पर्श केला.. वगैरे हे काय आहे? या देशाची लोकशाही धारातीर्थी पडत आहे. तुम्ही त्याबद्दल बोला, असं राऊत यावेळी म्हणाले.

याच मुद्द्यावर पुढे बोलताना राऊत यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. आम्हालाही आमंत्रण आलं आहे. गावात एखाद्या मोठ्या असामीचं लग्न असतं, तेव्हा संपूर्ण गावाला आमंत्रण दिलं जातं. खाण्यापिण्यासाठी बोलवलं जातं. पण, मुद्दा हा आहे की राष्ट्रपतींना का बोलवलं नाही, उपराष्ट्रपतींचं नाव का गायब आहे, ते राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. लालकृष्ण आडवाणी, ज्यांचं संपूर्ण आयुष्य या संसदेत गेलंय, ज्यांच्यामुळे भाजपला आज अच्छे दिन दिसताहेत, ते आडवाणी सध्या का गायब आहेत, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. भाजपचे प्रवक्ते हे काहीही खुलासे करत बसतील, पण मूळ प्रश्न हाच आहे की, नवीन संसद भवनाला कुणाचाच विरोध नाही. राष्ट्रपतींना दूर का ठेवलं, उपराष्ट्रपती गायब का झाले हा प्रश्न आहे. तुम्ही त्यावर का बोलत नाही, असा रोखठोक सवाल करत राऊत म्हणाले की, या सगळ्यामागचा उद्देश हा आम्ही, आम्ही आणि आम्ही हा एकच आहे. राष्ट्रपती कोण, उपराष्ट्रपती कोण, सरन्यायाधीश कोण, सर्व काही आम्हीच आहोत, सर्वकाही आम्हीच आहोत. आम्हीच ठरवणार, इतिहासात फक्त आपलंच नाव राहिलं पाहिजे, अजून काय असणार, अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली.

शिंदे गटावरून विचारलेल्या प्रश्नाला राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं. राऊत म्हणाले की, तुम्ही जो शिंदे-मिंधे गट म्हणताय त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहिलंच नाही. भाजपने पाळलेला तो कोंबड्यांचा खुराडा आहे. कधीही त्या कोंबड्या कापल्या जातील. तो पक्ष नाहीच आहे. कोंबड्या सकाळ संध्याकाळ आरवत असतात, त्यांना पक्ष म्हणतात का? त्यांच्याकडे पक्ष म्हणून काय बैठक आहे, विचारधारा आहे? फक्त निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून पक्ष होत नाही. त्या टोळीने 48 जागा लढवाव्यात, आम्हाला काहीही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे 19 खासदार होते, आमच्या 19 खासदारांचा आकडा लोकसभेत कायम राहील. त्यावर कुणी काहीही टीका केली तरी आम्हाला फरक पडत नाही. मी माझ्या पक्षाची, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका मांडतोय, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.