
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील यांना मोठय़ा मताधिक्यांनी निवडून देऊन पुन्हा या मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आज केले. या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना भवनमध्ये ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत सुभाष देसाई यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी होत आहे. या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी रत्नागिरी जिह्यातील बैठक गेल्या चार दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर आज शिवसेना भवनमध्ये ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले की, ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने उभे केलेले उमेदवार आताच्या निवडणुकीत भाजपच्या पालखीत बसले आहेत.
भाजपला या निवडणुकीसाठी स्वतःचा उमेदवारही उभा करता आला नाही, हे त्यांचे फार मोठे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा जनाधार मोठा आहे. शिक्षकांचे रखडलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावल्यामुळे अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. या निवडणुकीत आपले उमेदवार पहिल्याच पसंतीच्या मतांमध्ये पहिल्याच फेरीत निवडून येणार आहेत, असा विश्वासही सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शेकापचे नेते जयंत पाटील, जे. एन. म्हात्रे, उमेदवार आमदार बाळाराम पाटील, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, काँग्रेसचे नेते आर. सी. घरत, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील आदी उपस्थित होते.