मी जेव्हा ठरवतो की एखाद्याला गाडायचं.. तेव्हा गाडतोच, मालेगावात संजय राऊतांची शिवगर्जना

मालेगाव मध्ये शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने शिवगर्जना महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करत निवडणूक आयोग व मिंधे गटावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की “गेले काही दिवस माझी तब्येत ठीक नाही. मात्र मला आज मालेगाव मध्ये कोणत्याही परिस्थिती यायचंच होतं. कारण मी जेव्हा ठरवतो की एखाद्याला गाडायचं.. तेव्हा गाडतोच.”

“शिवसेना काय आहे हे तुम्ही 26 तारखेला पहाल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना गेल्या 55 वर्षांपासून आहे. तुमच्या आमच्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली. बाळासाहेबांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं नव्हतं. मराठी माणसाला या महाराष्ट्रात मुंबईत सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावं या एका जिद्दीपोटी बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली. मला शिवसेनाप्रमुख करा असं बाळासाहेबांनी कधीच सांगितलं नाही. शिवसेनाप्रमुख हे पद त्यांना जनतेने दिलं आहे. निवडणूक आयोग आमच्याकडून ते पद काढून घेतय. त्यांची लायकी आहे का? बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाला विचारून शिवसेना स्थापन केली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाला विचारून पद दिलं नव्हतं. हे जनतेने दिलेले पद आहे. निवडणूक आयोगाचा बाप आला तरी ते पद कोणी काढून घेऊ शकत नाही”, असे परखड मत यावेळी राऊत यांनी व्यक्त केले.

“लोकं म्हणतात की संजय राऊत टोकाचं बोलतात. हो.. मी टोकाचं बोलणाराच माणूस आहे. मी माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुरुंगात जाऊन आलो आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी या 50 गद्दारांप्रमाणे गुडघे टेकले नाही. तुरुंगात मी अतोनात त्रास सहन केला. मात्र तरीही मी शिवसेना सोडली नाही आणि सोडणार नाही. समोर बसलेले असंख्य शिवसैनिक ही खरी शिवसेना आहे. ज्यांच्यासाठी मला आणि आपल्याला लढायचं आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे हा खूप मोठा इतिहास शिवसेना आणि महाराष्ट्राचा आहे. हा इतिहास सहजासहजी कुणाला चोरता येणार नाही”, असे राऊत म्हणाले.

“यापुढची लढाई आणि संघर्ष कदाचित अधिक तीव्र असेल, कठीण असेल. पण एक लक्षात घ्या अंतिम विजय हा आपलाच आहे. यापुढे महाराष्ट्रात आणि देशात आपलंच राज्य असणार आहे आणि मग तेव्हा बघू ईडी आणि सीबीआय काय करते”, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले.