भाजप सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघु नये; शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे-पाटील

खरीप हंगामात गोगलगाय व सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक उध्वस्त झाले, त्यात यलो मोझॅक (हळद्या) या नव्या रोगाने राहिलेल पिकही बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना आता फक्त सरकारवर आशा आहे. त्यामुळे भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी भावना आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर, सांगली भागात ज्या पध्दतीने मदत दिली त्याच धर्तीवर धाराशिल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदतीची अपेक्षा असल्याचे मत आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापूर व सांगलीमध्ये ज्या पध्दतीन दोन वर्षाचे पिक कर्ज माफ केले शिवाय एसडीआरएफचे निकष बाजुला ठेवत मदत करण्यात आली, त्याचप्रमाणे आताही तशीच मदत मिळणे आवश्यक आहे अशी मागणी पाटील यांनी भाजपच्या सरकारकडे केली आहे. मागील काही दिवसापासून संततधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, त्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे जमिनीतच खराब झाले व ते उगवलेच नाही. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. तेव्हा झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आवश्यकता होती. कृषी व महसूल विभागाला शासनाकडून आदेश आले नसल्याने त्यानी वेळेत पंचनामे देखील केले नाहीत. एवढया मोठया प्रमाणात नुकसान होऊनही राज्य शासनाकडून पंचनामे करण्याचे कुठलेही आदेश दिले नव्हते.ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत देण्याची प्रक्रियाच सरकारने थांबवली हे संतापजनक असल्याचे आमदार घाडगे – पाटील यांनी म्हटले आहे. त्यानंतर झोपलेल्या सरकारला जाग आणावी लागली व पंचनामे करण्याचे आदेश आले, तोपर्यंत नुकसानीचं प्रमाण वाढत गेले होतं.

पेरणी झाल्यानंतर उगवून आलेले सोयाबीन गोगलगायी व इतर किडीमुळे वाया गेले. तसेच पेरणी केल्यानंतर पावसाने खराब होऊन न उगवलेल्या पिकाच्या नुकसानीची कसलीही मदत पिकविमा योजनेत मिळत नाही. त्यात आता अतिवृष्टीच्या संकटाने तर शेतकऱ्यांचे संपुर्ण पिकच वाहुन गेले आहे. राहिलेल्या पिकावर यलो मोझॅक (हळद्या) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपुर्ण पिकच वाया जाणार आहे. अशी नुकसानकारक परिस्थिती आली असताना किमान याबाबत तरी सहानुभूतिनं विचार करण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटल आहे.

यात शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेऊन हा खर्च केलेला आहे. त्यात गेल्या दोन वर्षातही नुकसान होऊनही पिक विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षाचे व चालु वर्षाचे पिक कर्ज माफ करणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा कर्जबाजारीपणामुळे या जिह्यात आत्महत्येचे प्रकार होण्याचा धोका निर्माण होण्याची भिती आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर व सांगली या जिह्यात अशाप्रकारची मदत करण्यात आली होती, तिथे कोरडवाहू पिकांस 20 हजार 400, सिंचनाखाली पिकांस 40 हजार 500 व बहुवार्षिक पिकांस 54 हजार रुपये मदत केलेली होती. तशीच परिस्थिती आता जिह्यात उद्भवली आहे. शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करुन पंचनाम्याचा अडसरही न पाळता थेट मदतीचा हात मिळावा अशी अपेक्षा आमदार घाडगे – पाटील यांनी व्यक्त केली आहे.