विरोधक तोंडावर आपटले, शिवसेनाच खरी ठरली

28

सामना प्रतिनिधी । मेहकर

मेहकर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांचे बलई जातीचे (अनु. जाती) प्रमाणपत्र बुलढाणा जात पडताळणी समितीने वैध असल्याचा निकाल दिल्याने शहरात शिवसेनेच्या वतीने आजच दिवाळी साजरी झाली. शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या निनादात या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांचे बलई सुतार जातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा (दोन विरुद्ध एक) निर्वाळा अकोला विभागीय जातपडताळणी समितीने ३१ डिसेंबर २०१५ ला दिला होता. राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. साहेबराव सरदार व अन्य यांच्या तक्रारीवरुन हा निकाल लागला होता. या निर्णयास आमदार संजय रायमूलकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाने २३ मार्च २०१७ ला याबाबत आदेश दिला की हे प्रकरण पुनश्च जातपडताळणी समितीकडे पाठवून सहा महिन्यात निकाल देण्याचे आदेश दिले.

बुलढाणा येथे जात पडताळणी समिती कार्यालय असल्याचे आमदार संजय रायमूलकर यांनी जातप्रमाणपत्र तपासणीसाठी पुराव्यासह जमा केले. १० ऑक्टोबर २०१७ ला या समितीने (त्रिसदस्यीय समिती) आमदार संजय रायमूलकर यांचे बलई जातीचे प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला. हे पत्र आज पोस्टाने आमदार रायमूलकरांना मिळताच मेहकरात आमदार संजय रायमूलकर यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे घरी धाव घेतली तर स्थानिक शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोलताशांच्या निनादात या निर्णयाचे शिवसैनिकांनी स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या