शिवसेनाच एलईडी लाईट मासेमारी हद्दपार करणार, आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन

22

सामना प्रतिनिधी । मालवण

नाणार प्रमाणेच विनाशकारी एलईडी लाईटची मासेमारी हद्दपार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. किनारपट्टीवर कारवाईस सुरुवात झाली आहे. एलईडी मासेमारीचा प्रश्न उद्धव ठाकरेच सोडवू शकतात असे मच्छीमार बांधवांचे मानने आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव शिवसेनेच्या पाठीशी राहतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर प्रमुख बाबी जोगी, नगरसेवक पंकज सादये, किरण वाळके, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, महेश देसाई, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, दर्शन म्हाडगुत यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘एलईडीच्या मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याप्रश्नी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांची समस्या जाणून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन यांचे लक्ष वेधल्यानंतर कोकण किनारपट्टी भागात मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. जे एलईडी ट्रॉलर्स पकडण्यात आले त्यांच्यावर कठोर कारवाई होणार. ज्याप्रमाणे रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला त्याचप्रमाणे एलईडी मासेमारी हद्दपार केली जाईल. एलईडी मासेमारीचा प्रश्न ठाकरेच सोडवू शकतात असा विश्वास मच्छीमारांना आहे. त्यामुळे मच्छीमार शिवसेनेच्या पाठीशी राहतील असा विश्वास व्यक्त करत मच्छीमारांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेत मतदानात भाग घ्यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

कोळंब पुलाची दुरुस्ती 90 टक्के पूर्ण झाली आहे.
1 मे पासून पूल पूर्ववत सुरू होणार आहे. पुलाचे काम लवकर होऊ नये यासाठी विरोधकांनी बरेच प्रयत्न केले. मात्र पुलाची दुरुस्ती झालीच. कसाल- मालवण रस्त्याचे काम सुरू झाले आहे. निवडणुकीनंतर किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे कामही सुरू होणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. मालवणचे भुयारी गटार, भूमिगत वीज वाहिन्यांचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. खासदार नारायण राणे आणि आमदार नीतेश राणेंनी मागील चार वर्षात कोणत्या योजना पूर्ण केल्या ? असा प्रश्न आमदार नाईक यांनी उपस्थित केला.

खासदार राऊत यांचे मताधिक्य वाढणार
मागील निवडणुकीनंतर शिवसेना- भाजपचा आलेख जिल्ह्यात वाढता राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचे मताधिक्य निश्चितच वाढेल असेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या