शिवसेनेचे खासदार ‘डॉक्टर’च्या भूमिकेत, ड्युटीवरील 200 पोलिसांची केली आरोग्य तपासणी

3449

एरवी जनतेचे प्रश्न देशाच्या संसदेत प्रभावीपणे मांडणारे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज आपल्या खऱ्याखुर्‍या ‘डॉक्टर’च्या भूमिकेत शिरले. त्यांनी ठाण्यात ड्युटी करीत असलेल्या सुमारे दोनशे पोलिसांची रस्त्यावर उतरून आरोग्य तपासणी केली. ‘कोरोना’ची लागण कुणाला झाली आहे काय तसेच या पोलिसांना काही अन्य त्रास आहे काय याचीही चाचणी घेण्यात आली असून ऑन द स्पॉट औषधे देखील देण्यात येणार आहेत. चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर या पोलिसांवर पुढील उपचार केले जाणार आहे. पोलिसांबरोबरच फिल्डवर असलेल्या पत्रकारांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली.

मंगळवारी सकाळी नितीन कंपनी सिग्नल येथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांची तपासणी करण्यात आली. सर्दी – ताप लक्षणे असलेल्या कोरोना संशयित पोलिसांची कोविड टेस्ट देखील करण्यात आली. कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या पोलिसांची तसेच पत्रकारांची टेस्ट खाजगी लॅबमधून करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे शहराबरोबरच अंबरनाथ, कळवा-मुंब्रा, उल्हासनगर, कल्याण , डोंबिवली येथेही ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिस व पत्रकार यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

तीन टीम तयार करणार
वन रुपी क्लीनिक, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्‍यमातून ही आरोग्य तपासणी करणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी तीन स्वतंत्र तीन टीम तयार करणार असून पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.

वसा सोडणार नाही
शंभर पेक्षा जास्त टेंपरेचर असलेल्या पोलिसांची सर्व प्रकारची आरोग्य काळजी घेणार असल्याचे देखील सांगण्यात आले. खासदाराच्या भूमिकेत वावरणारे श्रीकांत शिंदे आज आपल्या मूळ म्हणजे डॉक्टरच्या भूमिकेत शिरल्याचे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. मात्र सामाजिक व आरोग्य सेवेचा वसा आपण सोडणार नाही असे शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या