काळी पत्रिका काढाच, तुमचेच तोंड काळे होईल!

खासदार राहुल शेवाळे यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

मुंबई – मुंबई महापालिकेच्या कारभाराची काळी पत्रिका काढणार असल्याची धमकी देणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्यांना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज चोख उत्तर दिले. तुम्ही काळी पत्रिका काढाच, त्यात तुमचेच तोंड काळे होईल असे थेट आव्हान देत शेवाळे यांनी सोमय्यांची ‘काळी कुंडली’ जनतेसमोर मांडली. तसेच बिल्डरांसाठी सोमय्या करीत असलेल्या सर्व आरोपांचे उत्तर नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून आता मुख्यमंत्र्यांनीच द्यावे असेही त्यांनी ठणकावले.

मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी असतानाही किरीट सोमय्या मात्र पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बेताल आरोप करून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत सोमय्यांच्या आरोपातील हवा काढून टाकतानाच सोमय्या आणि भाजपच कसे कंत्राटदार आणि माफियाराज पोसत आहे, याचा पर्दाफाश केला.

सोमय्यांची काळी कुंडली

टँकरमाफियांना सोमय्याच जबाबदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात शिवाजीनगर येथे पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत सोमय्यांनी अनेकदा पत्र दिले होते. त्यानुसार १५० रुपयांना एक टँकर पालिका देते. पण हाच टँकर पुढे ८००-१००० रुपयांना विकला जात आहे. त्याची चौकशी व्हायलाच हवी.

मुलुंड डंपिंग ग्राउंडच्या बाजूलाच आकृती बिल्डरचा ५० एकराचा प्लॉट आहे. या बिल्डरला फायदा मिळवून देण्यासाठीच सोमय्यांचा मुलुंड डंपिंग बंद करण्याबाबत खटाटोप सुरू आहे. त्यामुळे डंपिंगचे पुढील नियोजन पूर्ण होऊ शकले नाही.

देवनार डंपिंगमध्येही गैरव्यवहार झाल्याचे सोमय्या म्हणत आहेत. पण येथील कंत्राटदार जय श्रॉफ यांचेच भाजपशी घनिष्ठ संबंध आहेत, त्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत फोटोही आहेत. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलात भाजपने केलेल्या ‘कोल्डप्ले’ या कार्यक्रमालाही श्रॉफ यांनी स्पॉन्सरशिप दिली होती.

निर्मल भारत योजनेंतर्गत टॉयलेट बांधण्याचे काम सोमय्यांच्या संबंधित असलेल्या युवक प्रतिष्ठानला दिले होते. यामध्येही मोठा गैरव्यवहार झाला आहे.

मिठी नदी आणि पवई तलावाच्या कामासंदर्भात सोमय्यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या होत्या, त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर सोमय्यांनी द्यावे.

भाजपच्याच नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर सर्वाधिक वेळा ‘एसीबी’ची कारवाई

भाजप स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या गप्पा करीत आहे. पण ‘एसीबी’ने दोन वर्षांत भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर सर्वाधिक कारवाई केली असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. नागपूर येथे २०१४ मध्ये १२४५ तर २०१५ मध्ये १०२६ गुन्हे दाखल झाले आहे, पण मुंबईत पाच वर्षांत केवळ ५२ गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपकडे असलेल्या राज्यांच्या ३० खात्यांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याच्या ‘एसीबी’कडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.

गृहखात्यातही पारदर्शकता नाही

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असून त्यामध्येही पारदर्शकता नसल्याचे शेवाळेंनी सांगितले. पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या पदांचा दर्जा अनेकदा सोयीनुसार खाली-वर केला जातो. मुंबईचे पोलीस आयुक्तपद अ‍ॅडिशनल डीजी दर्जाचे आहे. मात्र त्याचा दर्जा वाढवून डीजी करून दत्ता पडसलगीकर यांना आयुक्त केल्याचे ते म्हणाले. अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या करतानाही पारदर्शकता नसते.

आधी ‘पारदर्शकता’ शब्द नीट बोलावा

किरीट सोमय्या नेहमीच पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत आहेत. पण त्यांनी आधी ‘पारदर्शकता’ हा शब्द नीट बोलावा आणि मगच पारदर्शकतेच्या गप्पा माराव्यात, असा टोला राहुल शेवाळे यांनी लगावला.

…तर त्याला मुख्यमंत्रीही जबाबदार

राज्यातील सर्व महानगरपालिका नगरविकास खात्याच्या अखत्यारित येत असून या खात्याचे मुख्यमंत्री प्रमुख आहेत. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार आणि माफियाराज असल्याबाबत सोमय्या आरोप करीत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि माफियाराजला मुख्यमंत्रीही जबाबदार असल्याने सोमय्यांच्या आरोपांना त्यांनी उत्तर द्यावे असे शेवाळे यांनी ठणकावले. तसेच पालिकेच्या एखाद्या कामाचे टेंडर काढायचे असल्यास अधिकारीच प्रस्ताव तयार करतात. तो प्रस्ताव स्थायी समितीत आल्यास मंजूर करायचा की नाकारायचा एवढा अधिकार समितीला आहे. सदर प्रस्ताव नाकारल्यास आयुक्त आपल्या अधिकारात तो मंजूर करू शकतात आणि आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनीच पाठवले असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

नालेसफाईतील दोषींवर कारवाईसाठी शिवसेनेचा पुढाकार

नालेसफाईत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाई करावी म्हणून शिवसेनेने आधीच पत्र दिले होते. त्यानुसार कारवाईही झाली. तसेच ५५० कोटींच्या ३४ रस्त्यांच्या दर्जाबाबत चौकशी करण्यासाठी महापौरांनी प्रथम पत्र दिले होते. तसेच संबंधित कंत्राटदारांचे ९५० कोटी रुपयांचे डिपॉझिट आयुक्तांनी रोखून ठेवले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

rahul-shewale1

 

आपली प्रतिक्रिया द्या