शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसचा 162च्या संख्याबळावर सत्तास्थापनेचा दावा

470

भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व सहयोगी पक्षाकडे 162 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी देण्याची विनंती करणारे पत्र आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आले.

शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह सहयोगी पक्षाच्या 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयात देण्यात आले. राज्यपाल कोश्यारी नवी दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात हे पत्र सादर करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना खासदार विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी, के. पी. पाडवी आदी उपस्थित होते. सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना पत्र सादर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांना आमच्या 162 आमदारांच्या सह्या असणारे पत्र दिले आहे.

भाजपकडे पुरसे संख्याबळ नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकारने शपथ घेतली, पण त्यांच्याकडे संख्याबळ पुरेसे नव्हते असे त्यांनीच सुरुवातीला स्पष्ट केले होते. आताही त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे भाजपचे सरकार बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सीपीएम व सात अपक्ष या सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही सरकार स्थापन करू शकतो व सरकार स्थापन करण्याचा दावा आम्ही राज्यपालांकडे केला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

दूध का दूध, पानी का पानी

शिवसेनेचे विधिमंडळातील पक्षनेते एकनाथ शिंदे म्हणाले की, 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ ही लोकशाहीला धरून नव्हती . आमच्याकडे आवश्यक संख्याबळ होते, पण आम्ही वेळ वाढवून देण्याची विनंती आम्ही राज्यपालांकडे केली होती. पण आमची मागणी राज्यपालांनी त्यावेळी दुर्दैवाने फेटाळून लावली होती. ती लोकशाहीची पायमल्ली होती, पण आता दूध का दूध, -पानी का पानी सिद्ध करण्याची वेळ आली आहे.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा

आता आम्ही 162 आमदारांच्या नावानिशी सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यामुळे या संख्याबळाचा लोकशाहीचा मान राखत तत्काळ आमच्या मागणीचा विचार करा. आवश्यक संख्याबळ नसताना घाईगडबडीने पहाटे शपथविधी झाला. त्यांच्याकडे जर संख्याबळ असते तर उजळ माथ्याने दिवसाढवळ्या शपथ घेतली असती. आता जे सरकार स्थापन झाले आहे ते लोकशाहीला धरून नाही, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे म्हणाले.

विधान भवनाच्या सुरक्षेचा पोलीस आयुक्तांकडून आढावा,विधान भवनाबाहेर पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून सरकार स्थापन झाले आहे. अजित पवार हे अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी दिलेला व्हीप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल. त्यांच्या आदेशानुसारच आमदारांना मतदान करावे लागेल असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. अजित पवारांनी पाठिंब्याचे पत्र दिले तेव्हा ते गटनेते होते आणि त्यांचा तो पूर्ण अधिकार होता. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीने जरी अजित पवार यांना गटनेतेपदाकरुन काढले असले तरी त्याचा काहीच परिणाम सरकारवर होणार नाही, असे दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या