‘आरे’तील ‘मेट्रो’ कारशेडच्या नावाखाली अडीच हजार झाडांची कत्तल करू देणार नाही, शिवसेना आक्रमक

206

मुंबईला वेगवान बनवणाऱया ‘मेट्रो’सारख्या विकासकामांना शिवसेना कधीही विरोध करणार नाही. मात्र ‘मेट्रो’ कारशेडच्या नावाखाली ‘आरे’तील हजारो झाडांची कत्तल करू देणार नाही, अशी ठाम भूमिका मंगळवारी शिवसेनेने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत घेतली. या ठिकाणच्या 27 आदिवासी पाडय़ांचे पुनवर्सन कुठे करणार, कारशेडसाठी पर्यायी जागा का शोधत नाही, असे सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले. त्यामुळे तब्बल 2238 झाडे तोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आला. यावर आता 20 ऑगस्ट रोजी पाहणी केल्यानंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात तज्ञांचा समावेश नसल्यामुळे उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून समितीला निर्णय घेण्यास मज्जाव केला होता. यावेळी समितीत पाच तज्ञांची नियुक्ती केल्यानंतरच झाडे तोडणे, पुनर्रोपित करणे याबाबत निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या कार्यवाहीनंतर तब्बल दहा महिन्यांनंतर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची पहिली बैठक आज झाली, मात्र या पहिल्याच बैठकीत झाडे तोडण्यावरून चांगलीच खडाजंगी झाली. ‘मेट्रो-3’च्या कारशेडसाठी गोरगाव पूर्व ‘आरे’तील तब्बल 3500 झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील 2238 झाडे तोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेने जोरदार विरोध केला.

80 हजार तक्रारी-सूचनांचे काय केले?
‘आरे’तील हजारो झाडे तोडण्याबाबत पालिकेने मुंबईकरांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. यामध्ये तब्बल 80 हजार तक्रारी-सूचना प्राप्त झाल्या. या तक्रारींबाबत पालिकेने काय निर्णय घेतला, तक्रार-सूचनांना पालिकेने काय उत्तर दिले, पालिकेच्या उत्तराने तक्रारदारांचे समाधान झाले का, तज्ञांचे मत याबाबत लेखी माहिती पुढील बैठकीत प्रशासनाने सादर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. मुंबईत कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना ‘आरे’मधील जागेचाच हट्टहास का धरता, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या